- ना.रा.खराद
कुटुंब व्यवस्था जगामध्ये बहुतेक सर्वच देशांमध्ये आहे.ती एक नैसर्गिक गरज आहे.पशु पक्ष्यांचे देखील कुटुंब असते.जिव्हाळा,प्रेम ,आपलेपण, जपवणूक,आदर , जवाबदारी या व्यवस्थेचा आधार होता.ज्या ठिकाणी या बाबी आहेत,ते कुटुंब , पात्र आहे.या बाबींचा अभाव असलेले कुटुंब केवळ औपचारिक असते.
आत्मा नसलेल्या शरीरासारखे असते.पूर्वीसारखी कुटुंब व्यवस्था आता मूळीच शक्य नाही.कदाचित फक्त कुटुंब म्हणण्यापूरती ती शिल्लक आहेत,व्यवस्था वगैरे काही उरली नाही.कुठल्याही कुटुंबातील वातावरण बघता किंबहुना आपल्याच कुटुंबातील बघितले तर
अधिक लवकर जाणवेल की माणसे फक्त
एकत्र खाणंपिणं करतात,मनाने ती एकत्र नाहीत.आई वडील आपल्या औलादीवर जिवापाड प्रेम करतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे.परंतू औलाद भटकत चाललेली आहे.चंगळवादी बनलेली ,भावनाहीन पातळीवर पोहचली आहे.मुलांकडून जो त्रास
पूर्वी म्हातारपणी सुरू व्हायचा तो आता नववी दहावीच्या वयातील पोरांपासून सुरू झाला आहे.
आधुनिक साधनांची रेलचेल,कितीही कमवा तरी कमी पडणारे पैसे, यातून कुटुंब व्यवस्था कोलमडत चालली
आहे.आई बाप आपल्यावर उपकार करत नाहीत,अशी तरुणांची भावना आहे,आपण कितीही शेण खाल्ले तरी आई बाप नावाचे हक्काचे आगार ते सोसणार आहेत हेच या तरुणांना वाटते.
जीवनाचा खडतरपणा न अनुभवलेले, आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारे असले ऐतखाऊ अपत्य म्हणजे एक ब्यादच आहे.
व्यसनाधीनता,स्वैराचार त्यांना कुठे घेऊन जाणार हे काळच ठरवेल.दोन पीढीतला फरक आपण समजू शकतो ,तो केवळ साधनांपूरता हवा परंतु माणसे जर वृत्तीने बदलू लागली तर ती सुधारणार.अखेर विचार
तर करावयास हवा.आई वडीलांची चिंता वाढवणारी, त्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ही नतभ्रष्ट औलाद कधी विवेकी बनणार.
मुलांवर जीव ओवाळून टाकणारे आई बाप आणि त्यांना साधा आदर न देणारी मुले बघितली की कुठेतरी काहीतरी चूकते आहे असे वाटते.वयाच्या तिशीत देखील , आपल्या
बापाच्या कमाईवर गुजराण करणारी मुले बघितली की जाम राग येतो.पुन्हा आम्ही आमच्या बापाचे खातो,गर्वाने सांगणार.
घरातील साधी कामे देखील मुले करत नाहीत.इतके रागावले आहेत की उलटून बोलतात.सर्व कामे बाप नावाचा प्राणी करतो कारण ती त्याची पैदास असते.कोणतेही काम करायचे नाही,उद्याचा विचार करायचा नाहीअसली बैल मुले का घोड्यावर बसवण्याच्या लायकीची आहेत.
बिघडलेली मुले कुटुंबाला कलंक आहेत.अनेक कुटुंब मुलांनी उद्धस्त केली आहेत.कुंपन शेत खाऊ लागले तर फार कठीण होऊन जाते.आपल्या आई वडीलांना
रडावयास लावणारी ही मुले म्हणजे नालीतले
कीडे आहेत.दैवालाही लाज वाटावी असे त्यांचे वर्णन आहे.
आज घराघरांतून अशाच मुलांचे पडघम वाजत आहे.विभक्त कुटुंब,अति लाड यामुळे
मुले चूकीच्या मार्गावर चालली आहेत.आपसातील संवाद बंद झाला.कुणी कुणाचे ऐकत नाही.मला सर्व कळते,असा दर्प.ना मिळणाऱ्या प्रेमाची जाणीव ना कर्तव्याची जाण यामुळे बेफिकीर बनलेली पीढी कुटुंब व्यवस्थेतली अखेरची ठरु नये म्हणजे झाले!