- ना.रा.खराद
आपला देश प्राचीन आहे. महापुरुषांचा देश आहे. शालेयअभ्यासक्रमात महापुरुषांचे धडे असतात किंवा चरित्र असते. गुणांचा उल्लेख असतो.इतिहासातील हजारों वर्षापासून आजतागायत जितके महापुरुष तितक्यांचा उल्लेख असतो आणि शिक्षक बिचारे मुलांना
"आदर्श घ्या,आदर्श."असे सारखे सांगत असतात.पाच सहा वर्षाचं मुल त्यास,स्वामी विवेकानंदाचा आदर्श घ्या .' असे सांगणे काय उपयोगाचे! श्रीरामासारखे बना .कसे शक्य आहे? एकाच वेळी टिळकांसारखे आणि गांधी सारखे कसे बनता येईल.देश स्वतंत्र असतांना भगतसिंग सारखे इंग्रजाविरुद्ध कसे लढता येईल. लोकशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सारखी तलवार घेऊन घोड्यावर फिरलो तर चालेल का?
म्युनिसिपलचे लोक असतांना गाडगेबाबा सारखे मी गांवं स्वच्छता करु का!
विनोबा भावे सारखे भूदान आंदोलन उभारले
तर गुंठाभर जमीन तरी मिळेल का?मी राजा नसतांना श्रीरामासारखे वनवासाला जाऊ का. लालबहादूर शास्त्री सारखा साधेपणा कुणाच्या तरी अंगी येऊ शकतो का.भाड्याच्या घरात राहणारा मी किल्ला लढू का?
एकच बायको मोठ्या मुश्किलीने मिळाली ,अनेक राण्या असलेल्या राजाचा आदर्श मी कसा घेऊ.नोकरीसाठी नेत्यांचे पाय धरणारा मी ,छत्रपती संभाजी राजाचा
स्वाभिमान कोठून आणू. खोटे वागल्याविना
जिथे कोणतेच काम होत नाही, राजा हरिश्चंद्राचा आदर्श कसा घेणार?
देश स्वतंत्र असतांना मी गदर कुणाविरुद्ध करु.मला स्वतः चे घर नसतांना मी भगवान गौतम बुद्धासारखे राजवाडा कसा सोडून जाऊ.घरामध्ये लाईट असतांना मी महापुरुषांसारखा रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास का करु? माझ्या वाट्याची जमीन मला मिळाली असतांना. पांडवांचा आदर्श घेऊन मी भावांविरुद्द का लढू?
इतके सारे सरकारी डाक्टर रिकामे असतांना
बाबा आमटे सारखी कुष्ठरोग्यांची सेवा मी का
करु. संताची शिकवण तर भलतीच अवघड.
किर्तनकार,प्रवचनकारत्यांच्या शिकवणुकीचा उल्लेख करतात.संत रामदास लग्न मंडपातूनपळाले म्हणून काय सगळ्यांनी पळायचे.संत तुकारामाची गाथा तरंगली म्हणून काय आपली पुस्तके पाण्यात टाकून बघायची.
राधाकृष्णन शिक्षकाचे राष्ट्रपती झाले म्हणून
काय सर्व शिक्षकांनी तिकडे डोळे लावून बसायचे.महात्मा फुलेंनी पडक्या वाड्यात शाळा भरवली म्हणून काय चांगल्या इमारती पाडून शिकवायचे.सावित्रीचा आदर्श घ्यायचा म्हणजे आपल्या नवरोबास सत्यवान समजून यमाच्या हवाली करायचे!
पंतप्रधान मोदींनी चहा विकला म्हणून आपण
आपला धंदा बदलायचा?कर्ण दानशूर होता.
मग काय आपण सगळे दान करायचे! झांशीची राणी शुर होती म्हणून काय आंगनवाडीच्या शिक्षिकेने घोड्यावर बसून तलवार चालवायची.
ज्या त्या काळात ज्याने त्याने आपल्या योग्यतेनुसार, गरजेनुसार कार्य केलेले आहे. काळानुसार ते बदलते.एकाचवेळी अशा शेकडों महापुरुषांचे आदर्श कोण कसे घेऊ शकणार आहे?स्वतः महापुरुष देखील ते
घेऊ शकलेले नाही. काळानुसार सर्वकाही बदलते.आज जे महत्त्वाचे आहे आणि जे करण्याची आपली कुवत आहे तेवढेच करावे.उगीच विश्वगुरु वगैरे होण्याच्या फंदात पडू नये.आहे त्या जागेवर'चांगला माणुस ' म्हणून जगता आले तरी फार झाले.सर्व महापुरुषांचा मला आदर आहे,त्यांचा मी सन्मान करतो परंतु त्या प्रत्येकाचा आदर्श घेण्याइतका शुर, बुद्धीमान,त्यागी,तपस्वी मी निश्चित नाही.
एवढे प्रामाणिकपणे सांगण्याचा मला अधिकार आहे.
जे एकाने केलेले असते ते दूसरा करु शकत नाही. जे एका काळात गरजेचे असते, ते प्रत्येककाळात नाही.
आदर्श आपण असले पाहिजे,केवळ आपले आदर्श नाही.