- ना.रा.खराद
आपण स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा ठोकल्या तरी आपण पराधीन असतो,कारण आपल्या गरजा इतर लोक पूर्ण करत असतात आणि इतर म्हणजे पर तो कसा असेल,कसा वागेल याची खात्री नाही.अगदी चपलांचा
खिळा चूकीच्या पद्धतीने ठोकून दिला म्हणून दिवसभर त्या खिळ्याचा जाच सहन करत होतो.डोक्यावरचे केस नको तितके कापल्याने खुप मनस्ताप मी सहन केलेला आहे.एका खानावळीत जेवायला गेलो तर जेवणापूर्वी बील घेतले आणि त्या पैशातून सामान आणून मला जेवू घातले,मी आणि खानावळीचा मालक
दोघेही गरीब!
काम कोणतेही असू द्या, ते इतरांकडे असते आणि इतर म्हणजे पराधीन.पराधीनता खुप त्रासदायक, क्लेशदायक असते.अमक्या , तमक्याला जे अधिकार असतात, ते पराधीनतेची पराकाष्ठा असते.सर्वच
माणसे आपल्या ठिकाणी खुप कर्तव्यदक्ष असतात असे नव्हे.विनाकारण हेलपाटे मारायला लावणारे महाभाग कमी नसतात.काम अडवून ठेवणारे, विलंब करणारे लोक कमी नाहीत.
ज्यांच्यापाशी काम असते असा व्यक्ती चोखपणे व निर्दोष व तात्काळ काम करेल असे नाही, ते त्याच्या
मर्जीने चालते.प्रत्येक मनुष्य या बाबतीत अगतिक आहे,कारण कुणीही असला तरी त्याचे काम इतरांशी पडते आणि इतर म्हणजे पर ,या परच्याअधीन राहण्याशिवाय पर्याय नसतो.
आदेश, मागण्या, इच्छा, न्याय, अपेक्षा, आरोप सर्व काही इतरांचे, मग आपले काय असते! आपले काहीच
नसताना आपण फक्त गुलामाचे आयुष्य कंठत असतो.चूकीचे असले तरी जे स्विकारले जाते तीच गुलामी
असते.ब्र शब्द जिथे काढता येत नाही असे कोणतेही ठिकाण हे पारतंत्र्य असते.ते आपण सहर्ष स्वीकारलेले असते म्हणून त्यांचा दाह जाणवत नाही,कारण आपल्या सारखे करोडो लोक असेच जगत असतात.
कित्येक मोठमोठी कामे लहान लोकांनी अडवलेली असतात,तर लहान कामे मोठमोठ्या लोकांनी थांबवलेली असतात.इतरांवर अवलंबून असणे हे पारतंत्र्य आहे आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला आले आहे.
लहान सहान गोष्टींत देखील मनुष्य इतर कुणावर तरी अवलंबून असतो.हे अवलंबून असणे कधीकधी खुप मनस्ताप देऊन जाते.आपल्या मनासारखे नाही तर त्याच्या मनासारखे वागावे लागणे म्हणजे पराधीन!
स्वतः इच्छेने आणि मर्जीने जगण्याचे स्वातंत्र्य किती लोकांना आहे, आणि तसे कुणी जगू देते का?
जिथे इच्छेप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य नाही, तिथे स्वातंत्र्य कोणते आहे? प्रत्येक गोष्ट इतरांच्या पद्धतीने चालते मग आपले ते काय असते? खरेच पराधीन आहे जगी पुत्र मानवाचा!