‘ गुण ' पत्रिका

                                             ' गुण' पत्रिका
                                                                  - ना.रा.खराद
  कोणतेही कार्य करण्यासाठी अंगी गुण असावे लागतात.प्रत्येक यशस्वी व्यक्ती गुणांच्या बळावर यशोशिखरावर पोहोचतो.अनेकांच्या अंगी एखादा गुण असतो,तर एखाद्याच्या अंगी अनेक गुण असतात.
व्यक्तिगत जीवनात यशस्वी होण्यासाठी एक गुण देखील पुरेसा असतो, परंतु सार्वजनिक जीवनात इतरांना सोबत घेऊन चालताना अंगी अनेक गुण असावे लागतात.तो सर्वांगिण असावा लागतो. अंगी कला, कौशल्य असणे म्हणजे वेगळे आणि गुण असणे वेगळे. सर्वगुणसंपन्न असल्याखेरीज सर्वोच बनता येत नाही.
   एखाद्या सर्वोच्च गुणांमुळे मनुष्य यशस्वी होऊ शकतो, परंतु त्याआधारे त्यास सर्वोच्च समजणे केव्हाही चूक असते.आपण बघतो अनेक कलाकार, खेळाडू आणि राजकारणी यांनी आपल्या क्षेत्रात नाव कमावलेले असते, म्हणून त्यांना इतर क्षेत्रात ओढले जाते, महत्त्व दिले जाते,त्यांचा सन्मान होतो आणि त्या त्या क्षेत्रातील जे दिग्गज आहेत, ते वंचित राहतात.
 कोणत्या क्षेत्रात कोणत्या गुणांची आवश्यकता असते, हे अगोदर निश्चित करुन त्यायोगे जवाबदारी सोपवण्यात आली पाहिजे, तरच ते कार्य व्यवस्थित पार पडेल.क्रिकेटमध्ये नाव कमावले म्हणून राज्यसभेत घेणे, किंवा राजकारणात नाव आहे म्हणून विद्यापीठाकडून पदव्या बहाल करणे कितपत योग्य आहे.
 एका कामात कुणी तरबेज असला म्हणून त्याच्याकडे कोणतेही काम सोपविणे योग्य नसते.चित्रपटातून
लोकप्रियता मिळवली म्हणून त्यास राजकारणात घ्यायचे असे करुन काही साध्य होत नाही, फक्त उदोउदो करण्यासाठी कुणाला काहीही बहाल करणे बालिशपणाचे आहे.
   लग्न जुळवणी गुण पत्रिका बघून होते, अंगी असलेले गुण बघून नाही.परीक्षेत मिळवलेले गुण जसे फसवे
असतात,तसेच हे पंचागी गुण असतात.नेतृत्व किंवा प्रशासन यासाठी अंगी अनेक गुण असावे लागतात.
गुणहीन किंवा अल्प गुण असलेले लोक मातेरे करतात.वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले लोक आपल्या क्षेत्रात निपुण असतील, परंतु ते प्रत्येक बाबतीत निपुण असतील असे नाही, आणि इथेच चूक होते.
  जिथे अनेक गुणांची किंबहुना सर्व गुणांची गरज असते, तिथे एका गुणाकडे बघून एखादे कार्य सोपविणे सर्वथा चूकीचे आहे.सौंदर्य बघून लग्न जुळवणी होते, परंतु इतर अनेक गुण जे उत्तम संसारासाठी आवश्यक असतात, ते त्याच्या किंवा तिच्या अंगी आहेत का, हे बघितले जात नाही.
  कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही माणसांचा शिरकाव हे अतिक्रमण आहे.ज्याची त्याची लायकी, योग्यता आणि गुण व कौशल्य बघूनच निवड आणि महत्त्व दिले पाहिजे.एखादा बासूरी चांगली वाजवतो, म्हणून त्यास ढोलही बडवायला देणे चूक आहे.एखाद्या क्षेत्रात मिळवलेली लोकप्रिय किंवा लौकिक हा कोणत्याही निवडीचा निकष होऊ शकत नाही.विविध क्षेत्रात जे नामवंत आहेत, ते सर्वगुणसंपन्न आहेत, असे समजण्याची चूक करु नये, मात्र ज्या कामासाठी ज्या आणि जितक्या गुणांची आवश्यकता असते, ते त्या व्यक्तीच्या ठिकाणी असल्याखेरीज ते काम त्याच्याकडे दिल्या जावू नये, हे महत्त्वाचे.
   काम बौद्धिक असेल तर तशी बुद्धीमत्ता हवी.कार्य अनेक प्रकारचे असेल तर चौफेर बुद्धीमत्ता हवी.संवेदनशीलता,धाडस, विवेक, निर्णयक्षमता, निष्ठा वगैरे असले अनेक गुण असतात.हजारों गुण असताना एखाद्याच्या ठिकाणी पैकी किती आहेत,ह्याची चाचपणी आवश्यक असते.एखाद्या गुणाने प्रभावित होऊन चूकीचे निर्णय घेण्यात येतात आणि नंतर पश्चात्ताप होतो.
    
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.