- ना.रा.खराद
काळ खूप झपाट्याने बदलत आहे, खुप घडामोडी होत आहेत.जूने काही शिल्लक राहते की नाही असे वाटू लागले आहे.पूर्वी शेकडो वर्षांनी होणारा बदल आता काही दिवसांत होत आहे.साधनांची रेलचेल आणि ते प्राप्त करण्यासाठी चाललेली धडपड मानवी मूल्ये पायदळी तुडवीत आहे.नात्यामधील सौख्य संपुष्टात आले आहे.त्यामधील समन्वय आणि आदर व मर्यादा नष्ट झाल्या आहेत.नात्यामध्ये विश्वास उरला नाही, पराकोटीचा स्वार्थ सर्वांच्या ठायी दिसून येतो आहे.
आई वडील,भाऊ बहिण,मामा, मावशी, आत्या,आजी आजोबा,काका यांच्याकडून होणारी प्रेमाची उधळण थांबली आहे.हल्ली नाती नावापुरती उरली आहेत.अत्यंत व्यावहारिक पातळीवर ती निभावली जात आहेत.
नात्यातील ' भावबंध ' कुठेच आढळत नाही.त्याग, समर्पण, निष्ठा काळाने गिळंकृत केले आहे.विभक्त केवळ कुटुंबच होतं नाही तर मनेही दुभंगली जातात.रक्ताची नाती देखील आता पारखी होत आहे.
प्रेमाच्या, वात्सल्याच्या जोरावर परक्याला आपले करणारी माणसे होती आणि आता प्रेमाच्या अभावामुळे आपलीच माणसे परकी वाटावीत इतकी दुरावत चालली आहेत.एकमेकांना सोडून घास न खाणारी माणसे एकेकाळी होती आणि आता तीच माणसे एकमेकांना खायला उठली आहेत.
खरंच माणूस प्रगत झाला आहे का,तो इतका कठोर, पाशवी का बनत चालला आहे.डोळे हे फक्त बघण्यासाठी नसतात, त्यामध्ये जो भाव असतो, अश्रूंचा तो मार्ग आहे.आशिर्वाद देण्यासाठी उठणारे हात आता दिसत नाही.मायेने कवटळणारी आणि वियोगानी विव्हळणारी मनुष्य जात आता उरली नाही.
आपल्या बहिणीला सणावाराला माहेरी घेऊन येणारा भाऊ आता कुठे दिसत नाही.आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी आतुर झालेली मुलगी सापडत नाही.आपल्या मित्रांसाठी जीव द्यायला तयार असलेला मित्र दिसत नाही.खरेच काळ खूप बदलतो आहे.
सुख साधणं, प्रतिष्ठा हेच आता महत्त्वाचे झाले आहे.ज्याच्यापासून फायदा नाही, त्यांच्याशी काडीमोड घेतला जातो.पैसा सर्वस्व बनला आहे.ज्याच्याकडे पैसा तोच आता मोठा आहे, वयाने मोठे असणे आता
मोठे नाही.सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जाऊया,म्हणण्याचे आता दिवस उरले नाही.माय मरो आणि मावशी उरो,अशी मावशी आता कुठे आढळत नाही.इतकेच काय स्वतःची मुले आईवडिलांना विचारत नाही.
नात्यात आता भाव उरलेला नाही, जे आहे ते व्यावहारिक आहे.येणाऱ्या काळात हे चित्र अधिक भीषण होणार आहे.संयुक्त कुटुंब तर सोडा, विभक्त हे अति विभक्त होतील.एकटा चलो रे!
नातं विश्वास, श्रद्धा, प्रेम, आपुलकी,आदर यावर टिकते, जिथे स्वार्थ तिथे संपुष्टात येते.नात्यातील कलह, विसंवाद आणि सदोष स्पर्धा यामुळे ते कधीच जुने रुप धारण करु शकणार नाही.भाव तिथे देव, तसे भाव तिथे नाते असते.इतरांसाठी काहीच न करण्याचा भावना जिथे असते, तिथे नाते कसे टिकणार?
नात्यातील भावबंध हाच खरा जोडणारा धागा असतो आणि तोच नसेल तर तो कसा असणार.बदलत्या
काळात कितीही बदल किंवा प्रगती झाली, तरीही जोपर्यंत नात्यातील भावबंध टिकुन राहत नाही,तो पर्यंत
जगण्याचे बळ येत नाही.असलेल्या नात्यातील भावबंध टिकुन ठेवला तरच हे शक्य आहे.