मी निसर्गवेडा
- ना.रा.खराद
मी निसर्गवेडा मनुष्य आहे , हे सांगताना
मला अभिमान वाटतो, अपमान नाही.
आस्तित्वाच्या कणाकणाशी माझे नाते आहे.ते नाते मी अधिक घट्ट करु इच्छितो.
माझ्या चिमुकल्या डोळ्यांना जे आभाळ दिसते ते कोणत्यातरी चेतनने.ती चेतना मला ईश्वर वाटते.माझा ईश्वर संकुचित नाही, तो मला दगड धोंड्यात दिसतो.तो दगड तुम्ही पायरीसाठी वापरला तरी मला तो पुजणीय आहे,त्यावर पाय ठेवतांना तो आपला धर्म पंथ विचारत नाही.किती गंमत आहे.धार्मिक कट्टर लोक इतर ठिकाणी सर्व एकत्र वापरतात आणि जिथे प्रार्थनास्थळ म्हणतात तिथे मात्र भेदभाव करतात.त्यासाठी व त्यामुळे भांडतात.
भाजीपाला,अन्नपाणी सर्वांना एक चालते मग प्रार्थनास्थळ का नाही.आस्तित्व एक आहे.चेतना एक आहे मग प्रार्थनास्थळे काय स्पर्धेतून निर्माण होतात.द्वेषातून निर्माण होतात.त्याच्या नावावर जे चालते ते बघता हे खरेच वाटायला लागते.
मनुष्य कधीतरी हा विचार करेल का? मनुष्य धार्मिक असू शकतो परंतु माझा धर्म,तुझा धर्म अजून मला हे कळालेले नाही.जिवंत आस्तित्व कायम तुमच्या सोबत असतांना तर याची पूजा तुम्ही करत नाहीत.जे अन्न खाऊनआपण जगतो ते ज्या मातीतून निर्माण होते ती माती आपण कपाळावर लावत नाही.जो
प्राणवायू सर्वांना जिवंत ठेवतो त्यामधला प्राण आपणास दिसत नाही.
जिथे नतमस्तक व्हावे असे संपूर्ण आस्तित्व असून लाखों प्रार्थनास्थळे,पुतळे निर्माण करुन आस्तित्वाला आवाहन देऊ पहाता.आपणास झोपेतून जागवणारा कोण आहे,कधी विचार केला?
आस्तित्व हाच खरा ईश्वर आहे.इतर कुठल्याही ईश्र्वराच्या नावाने काहीही करण्याची गरज नाही.ईश्वर जर निर्माता असेल तर निर्मात्यास तुम्ही निर्माण करु
शकत नाही फक्त कृतज्ञ होऊ शकता.मग संपूर्ण ब्रम्हांड आपले आहे.त्यातील सर्व जीव आणि निर्जीव देखील आपले आहे.
आपण वेगळे नाहीत.आपण आस्तित्वाचे कण आहोत.कणाकणात संघर्ष असण्याचे कारण नाही.
अस्तित्वात ज्यास ईश्वर दिसतो तोच आस्तिक होय.नैसर्गिक गोष्टींविषयी आस्था बाळगणे हीच खरी भक्ती होय.
आपल्यातील ' मी' गळून पडल्याशिवाय कुणी आस्तिक नाही बनू शकत.