पाणी

              पाणी
                    - ना.रा.खराद
मानव व इतर सर्व जीव आणि वृक्ष वेली यांचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे.पाणी हा घटक वगळला तर वरील सर्व घटकांचे जीवन धोक्यात येईल.शरीर असो की पृथ्वी पाण्याचे प्रमाण जास्त आहे.ज्याची गरज जास्त ते जास्त उपलब्ध आहे, हे मोठे रहस्यमय आहे.सर्व जीव पाण्याचा शोध घेतात आणि आपली तहान भागवतात.जगभर असलेले समुद्र, नद्या,सरोवर,झरे, ओढे हे सर्व निसर्गाची किमया आहे.मानवी जीवन
पाण्यावर अवलंबून आहे,जर पाणी नसेल तर अन्नधान्य, फळे कोठून मिळणार.मानवी देहाची स्वच्छता पाण्यामुळे होते.आपला कोणताही रंग नसलेले पाणी कोणताही रंग स्विकारले.पावसाच्या माध्यमातून सर्वत्र प्रेमाचा वर्षाव करते.स्वत:ला घाण करुन मानवाला स्वच्छ करते.मानवाने उभारलेल्या इमारती असो की कारखाने पाण्याविना नाही.
पाण्यामध्ये पोहता येते, अनेक जीव पाण्यात राहतात, खुप मोठे खाद्य मासे व इतर माध्यमातून मिळते.
पावसाचे पाणी मनसोक्त वाहते.आपल्यासोबत इतरांना घेऊन वाहते.दगड आडवे आले तर आपला रस्ता बदलते किंवा त्यावर मात करते.
उंचावरून आदळणारे पाणी किती मोहक असते, धबधबा हे नाव प्राप्त होते.डोंगर कड्यावरुन ओघळणारे पाणी एखाद्या सुंदरीच्या गालावरुन वाहते आहे असे भासते.भिजलेल्या तरुणीचा देह जगण्याची प्रेरणा देतो.तिचे सौंदर्य खुलवतो.
  घरी पाहुणे आले की अगोदर पाणी दिले जाते.अंघोळीसाठी नित्य पाणी हवे असते.पाण्याचा आपला कुठलाही आकार नाही, परंतु कोणत्याही आकारात ते बसवता येते.पाणी विविध प्रकारे साठवता येते, गरजेपुरते सोबत ठेवता येते.मरण्यापूर्वी पाणी पाजले जाते.
लहान मुले एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात, उद्यानात पाण्याचे कारंजे डोळे दिपून टाकतात.पाणी जसे उथळ असते,तसे ते गहिरे असते.पाणी पोटात असते, ओठांत असते.पाणी थांबते, पाणी धावते.
पाणी थेंबात असते, समुद्रात असते.पाणी जमीनवर तसे जमीनीखाली असते.पाण्यावरुन शेंकडों वाक्प्रचार तयार झाले.पाणी डोहात असते, डोळ्यात असते.पाणी
धर्मनिरपेक्ष असते, भेदाभेद अमंगळ मानते.पाणी जसे वाचवते तसे ते बुडवून टाकते.पाण्याचीही मर्यादा असते,तशी ती मानवाच्या ठिकाणी असली पाहिजे,असे पाणी सुचवते.खवळलेला समुद्र आणि उसळलेल्या लाटा बरेच काही सांगून जातात, ते ओळखले जावे.
पाणी जसे जीवन आहे,तसे ते मृत्यू देखील आहे.ओलावा त्याचा गुणधर्म आहे, जीवन शुष्क, कोरडे असू नये,भावनेचा ओलावा त्यामध्ये असला पाहिजे.पाणी वेगवेगळे आवाज करते,कधी ते मौन बाळगते.खळखळ वाहणारे पाणी संगीताचे महत्व सांगते.मनमोकळे असावे असे सुचवते.
पाणी हे केवळ पाणी नाही तर जीवनाचे तत्त्वज्ञान आहे.तत्वज्ञान हे फक्त पुस्तकात असते असे नाही,ते पृथ्वीच्या कणाकणात आहे,त्याची ओळख करून घेतली पाहिजे आणि त्याविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.