उन्हाळा

                                           उन्हाळा , येरे.. येरे!
                                                          - ना.रा.खराद
आपल्या आयुष्यात कायम न चुकता येणारी गोष्ट म्हणजे उन! उन्हाळा हे त्यास लाभलेले नाव.सूर्याची दाहकता अनुभवायला मिळते ती उन्हाळ्यात.उन्हाने लाहीलाही होते,.मानव, पशुपक्षी, वनस्पती सर्वांना उन तापदायक ठरते.परंतु उन्हाचा तडाखा किंवा दाह कितीही असला तरी त्यामध्ये एक सौंदर्य आहे, तत्वज्ञान आहे,ते उपयुक्त आहे,ते ऋतूंचे चक्र आहे.
 उन्हाळ्यात उन्हामध्ये जायला कुणी धावत नाही, अपरिहार्य असेल तर संरक्षण साधणं असतातच.ज्यांना कायम उन्हात राहावे लागते त्यांना सवय होऊन जाते, त्यांना त्रास होत नाही, परंतु कायम सावलीत वावरणारी माणसे कडक उन्हात पार कोलमडून जातात.घामाघूम होतात.उन्हाचा आपला एक स्वभाव असतो, वेळ पाळण्यात तो
पटाईत असतो.
  उन्हाळ्यात रस्त्यावर वर्दळ कमी असते.जो तो सावलीच्या शोधात असतो.आंबा,लिंब वगैरे अनेक झाडे हिरवीगार असतात, उन्हाळ्यात देखील दिमाखात उभी असतात,विधात्याची किमया न्यारी! उन्हाळ्यात अनेक नैसर्गिक घडामोडी होतात.तहान वारंवार लागते, जमीन तापलेली असते.अंग घामाने भिजते.अनेक फळे या मोसमात मिळतात,उन्हाचा दाह कमी करतात.
 पायाला चटके बसू नये म्हणून आपल्या बाळाला कडेवर घेऊन चालणारी व त्यास उन लागू नये म्हणून डोक्यावर पदर धरणारी आई उन्हाळ्यात बघायला मिळते.माठातले थंड पाणी अमृताची गोडी देते ते याच मोसमात.वर्षभरासाठी हव्या असलेल्या पापडखारुड्या उन्हाळ्यात केल्या जातात.कैरीचे लोणचे उन्हाळ्यात केले जाते.भलेमोठे टरबूज कुटुंब एकत्र बसून खाते तो उन्हाळा.बच्चे कंपनीला ह्याच उन्हामुळे सुट्टी मिळते, मामाच्या गावाला जायला मिळते.
हिवाळा आणि पावसाळ्याच्या मधला उन्हाळा खुपच मोलाचा आहे.तो दाहक, तापदायक असला तरी खुप उपयुक्त आहे.उन्हाचे देखील आपले एक सौंदर्य असते.दुपारच्या वेळी सूर्याची किरणे जेवण पाण्यात पडतात तेव्हा जे दृष्य दिसते ते किती लोभस असते.उन्हाळ्यात डोहात पहुडलेल्या म्हशी किती गोंडस दिसतात.चिखलात माखलेले डुक्कर किती आनंद घेते.
 उन्हानंतर येणारी सावली किती सुखद असते.थंड पदार्थ सोबतीला असतात.तीव्र उन्हाळ्यात काबाडकष्ट करणारी माणसे बघितली म्हणजे कळतं की तोंड दिले,सहन केले तर कशावरही मात करता येते.टोपी, रुमाल या मोसमात दिसायला लागतात.डोक्यावरचा पदर ढळत नाही.नाजूक लोक नाजूक छत्री वापरतात.पावसाळा जवळ आला की उन्हाळा सरत आल्याची चाहूल लागते.जो तो उन्हाची तक्रार करतो.
 एखाद्या घनदाट अशा झाडाखाली बसलेले वृद्ध लोक तिथेच उन टाळतात, गप्पा टप्पा करतात.उन्हाळ्यातील
रखरखीतपणा मानवी जीवनातील दाहक दर्शन घडवतो.उन्हाळ्यात आकाश स्वच्छ दिसते.पोहण्याचा आनंद घ्यायचा हा काळ असतो.सावली उन्हावर मात करते.उन्हाळ्यातील उष्ण हवा नकोसी होते.उन्हाळा हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार करतो.
 ऋतुचक्रात उन्हाळा हा कायम येत राहणार आहे, आणि तो येणे आवश्यक आहे.उन्हापासून दूर राहता येते.उन्हाचा
निषेध न करता तो आवश्यक घटक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.पावसाप्रमाणे उन्हाळ्याचेही स्वागत केले पाहिजे.


Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.