आपल्या अवतीभवती अशी कित्येक माणसे असतात की ज्यांना आपण कधीच आनंदी बघितले नसेल.
माणसांची ही जमात कशानेच आणि कुठेच आनंदी राहत नाही,अशांचे सानिध्य किंवा सहवास कुणालाच नकोसा असतो.
हे जग दुःख आणि अडचणींनी भरलेले आहे, म्हणून का तेच बघायचं आणि ठोकायचे? डोळे उघडे ठेवून बघा
खुप काही आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत.गटार साचले म्हणून नगर परिषदेला शिव्या,मच्छर चावला की लगेच राजकारणी लोकांची खरडपट्टी.लहानसहान गोष्टींवरुन चिडवायचे, रागवायचे जीवनाचा किती अपव्यय.
सतत तक्रार,गाऱ्हाणे,नाराजीने ते ग्रासलेले असतात.पडक्या चेहरा घेऊन फिरणारी ही माणसे म्हणजे चालते फिरते दु:खाचे प्रसारक असतात.सततची चिंता हा त्यांचा स्थायीभाव असतो, आनंदी माणसे त्यांना अज्ञानी वाटतात.
जगात इतके दु:ख भरलेले असतांना लोक आनंदी कसे राहतात हा प्रश्न त्यांना भेडसावत
असतो.फक्त माझ्या वाट्याला दु:ख आले आहे,असा त्यांचा समज असतो.
कुठे काहीही चांगले , आनंददायी काही आहे असे त्यांना मूळीच वाटत नाही.चिंतेचा कीडा
असा घुसलेला असतो की काही केल्या तो जात नाही.
गर्दीत गेले की , 'लोकसंख्या खुप वाढली हो'असे विधान करणारच.कुठे डान्स सुरू असला की,"हल्ली लोकांना नाचण्यापलीकडे काही जमत नाही,लाज सोडली हो."
एखादे गटार आडवे आले की,काय ही घाण ,न.प.काय करते? येऊ द्या वसूलीला!" अशी धमकी देतात.
रस्त्यावर मुलं खेळत असली की पारा चढलाच. "आई बापाने काही वळण लावले नाही,असली
मुलं नसलेली बरी."
कुठे मोटरसायकली दिसल्या की,"किती या गाड्या , कशाला फिरतात उगीच इकडे तिकडे."
काही खरेदी केले की,"किती ही महागाई हो!" रोडवर खड्डा जरी दिसला,"पैसे खातात साले!"
असे बोलून मोकळे होतात.
सदोदित नाराज राहणारी असली माणसे नकोसी वाटतात.तक्रारी कमी करा आणि जीवनाकडे आनंदाने बघायला शिका.स्वत: तर निराशावादी राहूच नका , इतरांनाही निराश करु नका.