श्रेयवाद

                श्रेयवाद 
                     - ना.रा.खराद
कोणतेही यश कुणा एकाचे नसते, त्यामागे अनेक घटक असतात, परंतु श्रेय मात्र कुणी एक मिळवू पहातो.सिंहाचा वाटा,खारीचा वाटा वगैरे ह्यातूनच उदयास आलेले बिरुदे! योगदान,कृपा,हात हे तर नित्याचेच झाले आहे.श्रेय जसे ओरबाडून घेतले जाते तसे ते केविलवाणे मागितलेली जाते किंवा आपल्या चमचाकरवी ते वदवून घेतले जाते. मी केले,मी सांगितले, माझ्यामुळे झाले असे श्रेयवादी वदवतो.
सरकारी कामे जे सरकारी पैशाने होतात, तिथेही श्रेयवादाचा फलक लावला जातो.
छोटासा बस थांबा परंतु भलेमोठे आमदाराचे नाव लिहिले जाते.अमूक धरण यांनी बांधले, खुप हास्यास्पद असते हे सर्व.धरण बांधले मजूरांनी,पैसा सरकारी आणि श्रेय मात्र कुणा दुसऱ्याला.
   एखादा यशस्वी मुलगा यशाचे श्रेय आई वडिलांना देतो ,जमलेच तर गुरुंना, परंतु जरा खोलात गेले की कळते हजारों घटक त्यामागे असतात, परंतु श्रेय लाटण्याची किंवा ते दान करण्याची हौस मात्र वेगळीच! 
 मी जेव्हा म्हणतो माझे यश हे गावाचे आहे,तर लोक मला वेडा समजतात, परंतु मी जेव्हा ते समजावून सांगतो तेव्हा त्यांना ते पटते.कुणा एकाचा उदोउदो करण्यात येतो, परंतु ते खरे असते का, आपण कधी
सिंहावलोकन करतो का, श्रेय कुणाचे आणि किती?
 पेपरला वेळेवर पोहचवणारा रिक्षावाला किंवा परीक्षा फी भरणारा मित्र आपण का विसरतो? 
फक्त आईचे गुणगान करुन मोकळे होणारे कित्येक अज्ञानी बघितले मी, त्यांना बापाचा त्याग दिसत नाही.आपले कोणतेही यश सार्वजनिक असते,मग स्वतःला किती घ्यायचे आणि कुणाला किती द्यायचे हे ठरवायला पाहिजे.
दैववादी लोक तर सर्व श्रेय ईश्वराला देतात आणि इतरांची उपेक्षा करतात.अमूकचा शोध कुणी लावला,तमूकचा अंत्यसंस्कार कुणी केला,तमूकचे प्राण कुणी वाचवले इतिहासाचा श्रेय वाद काथ्याकूट सुरुच असतो.स्वातंत्र्य अमूकने मिळवून दिले असा प्रचार होतो, परंतु कुणा एकामुळे ते 
शक्य आहे का? कोणतेही मोठे कार्य कुणीही एक व्यक्ती करत नसतो, हजारों लोकांचे सहकार्य असते,श्रेय मात्र कुणा एकास दिले जाते.
लाखों मतदार मतदान करतात तेव्हा आमदार, खासदार निवडून येतो, मात्र तो नेता मतदारांना विसरतो आणि श्रेय स्वतःला घेतो‌.
  अनेक वेळा अनेक गोष्टी आपसूकच होतात,त्याचेही श्रेय घेण्यासाठी झुंबड उडते ‌.श्रेयाची ही उचकापूरी कधीच थांबणार नाही.पडद्यामागचे लोक नेहमी उपेक्षित राहतात.एखादे गाणे लोकप्रिय झाले की त्याचे श्रेय कधी गायक, गीतकार, संगीत, अभिनेता, दिग्दर्शक वगैरे पैकी एकाला दिले किंवा घेतले जाते, परंतु हे श्रेय सर्वांचे असते, हे कुणी लक्षात घेत नाही.
श्रेय कमीजास्त असू शकते, परंतु ते कुणा एकाचे कधीच नसते.अपयशाला जवाबदार कुणी होत नाही,मग श्रेयाला तरी पुढे का यावं.यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळा उल्लेख करते, अपयशी मुलांचे काय? फक्त यशाचे वाटेकरी आपण, ज्या दिवशी अयशस्वीतेची जवाबदारी आपण स्विकारण्याची तयारी ठेवू तेव्हाच यशाचे श्रेय आपण घेऊ शकू.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.