- ना.रा.खराद
हो,मी भाग्यवादी मनुष्य आहे अथवा दैववादी म्हणा.मी हस्तरेषा, ग्रहतारे जरी मानत नसलो तरी घडणाऱ्या घटना आणि त्याचा होणारा परिणाम या आधारे भाग्यवादी आहे.ज्या घटना आपण घडवलेल्या नसतात, परंतु आपणावर परिणाम करतात, तिथे भाग्य किंवा दैव असते.कोणत्याही घटनेचे बरेवाईट परिणाम होत असतात,आपण त्याचे भाग असतो.आपण जे काही करतो,त्याचे प्रेरक आपण स्वतः मूळीच नसतो.नेहमी बाह्य घटकांचा त्यांच्याशी
संबंध असतो, परंतु ते आपण बघत नाही,तसा विचार करत नाही.
रात्र झाली म्हणून झोपायचे आणि दिवस उजाडला म्हणून जागे व्हायचे, यामध्ये रात्र आणि दिवस प्रेरक आहेत.
आपले संपूर्ण जीवन असेच कोणत्यातरी प्रेरणेने चालत असते, आणि कोणतीही प्रेरणा आपल्या आवाक्यात नसते,ती स्वयंभू, स्वतंत्र असते.
रस्त्यावर खड्डे असतील,वाहक ज्यावेळी ते चूकवतो तेव्हा खड्डे हे प्रेरक आहेत, ते तुम्ही खोदलेले नाहीत, आणि जे आपण केलेले नाही, परंतु आपणावर परिणाम करते ते भाग्य अथवा दैव होय.
आपल्या अवतीभवतीची कोणतीही घडामोड आपणास प्रेरित करते,त्या अनुषंगाने आपण वर्तन करतो म्हणजे आपण जे वर्तन करतो , ते बाह्य प्रेरणेने! उन असेल तर सावली शोधणं,
इथे उन हे प्रेरक आहे आणि सावली देखील, दोन्ही आपण निर्माण केलेले नाही,पण दोन्हींचा परिणाम मात्र आपल्यावर होतो,इथेच भाग्य सुरू होते.वीज कोसळते तेव्हा लाखों लोक रस्त्यावर असतात,कुणी एक मरण पावतो,हेच दैव आहे.ज्या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असतो, ते धरण कधी मरण बनते.एक सूर्य ☀️ उगतो,
सर्व सृष्टीवर त्याचा परिणाम होतो.चिंचेचे झाड बघितले की तोंडाला पाणी सुटते, इथेही चिंच प्रेरक आहे.
एका लहान घटनेतून मोठ्या घटना घडतात,तर कधी एका मोठ्या घटनेतून अनेक लहान घटना घडतात.आपण परिणाम करत नसतो तर आपल्यावर
परिणाम होत असतात.
या सृष्टीचे जे चक्र आहे ते अव्याहतपणे सुरू असते , मानवीय घटनांची जोड त्यास असते.इथे कशामुळे आणि कुणामुळे तरी काही घडते, हे जे कारणीभूत आहे तेच दैव आहे.दैवापुढे कुणाचेही काहीही चालत नाही, जे व्हायचे तेच होते, तुम्ही प्रयत्नाने काही मिळवू शकत नाही,टिकवू शकत नाही.हा सर्व खेळ दैवाचा आहे.
असे पाहिजे होते,असे नसते तर तसे नसते झाले,या सर्व वल्गना आहेत, ते तसेच होणार होते.
एक घटना त्याचे अनेक पडसाद उमटतात,आपले जीवन पडसाद आहे.
पडसाद म्हणजेच भाग्य.आपल्या ताब्यात नसणारी कोणतीही गोष्ट दैव आहे,कुणी दैव मानले नाही तरी परिणामातून सुटका नाही.
कुटुंबातील एक व्यक्ती जेव्हा आमदार, खासदार होतो तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब समृद्ध होते, त्यांनाही अनेक पदे मिळतात, हे कशामुळे?
महायुद्ध होते,जगाचा नकाशा बदलतो,वादळ येते खुप नासधूस होते, भूकंप होतो होत्याचे नव्हते होते.आपण घटना घडवत नाहीत,तर फक्त त्या घटनांचे बाहुले आहोत,कठपुतली आहोत, संचालन
कुणी दूसराच करतो आपण फक्त झुलायचे.हे झुलने म्हणजे दैव आहे.
प्रत्येक व्यक्ती भाग्य किंवा दैव आपसूकच मान्य करतो, परंतु उघडपणे दैववादी असल्याचे मान्य करत नाही, प्रयत्न किंवा कर्माचे फळ
म्हणून दैवावर मात केली असे बोलतो.
दैवावर कुणी मात करत नाही, परंतु दैव
सर्वांवर मात करते.
अंगरक्षक गोळ्या घालतात.राजाला फाशी दिली जाते.दैव काहीही घडवते.दैवाचा खेळ कुणालाच कळत नाही.काय चालले हे जरी कळत असले तरी का चालले कुणाला कळत नाही.कुणालाही जिथे कळत नाही, तिथे दैव,भाग्य मान्य करावे लागते.
माझा भाग्यवाद किंवा दैववाद हा
वेगळ्या प्रकारचा आहे.तो व्यवस्थितरीत्या समजून घ्यावा आणि आपले काही वेगळे मत असेल तर कळवावे.
- 8805871976