बघतोस काय!

        बघतोस काय!
डोळे असणाऱ्या प्रत्येक माणसाला दिसते, परंतु प्रत्येक मनुष्य बघतो का आणि जरी बघत असला ,तरी तो काही प्रतिक्रिया करतो का? याचे उत्तर बहुदा नाहीच!
रस्त्यावर एक 🐕 कुत्रा मरुन पडला हजारों लोक तेथून गेले तरी कुणीही त्या कुत्र्याला ओढत बाजूला करत नाही.रस्त्यावर पडलेला दगड किंवा काटा उचलून फेकत नाही,मग नुसते बघून कसे चालणार, बघून काही प्रतिक्रिया घडत 
नसेल तर हा कानाडोळा नुकसान करणाराच आहे.
आपल्या अवतीभवती किंबहुना आपल्या समोर अशा अनेक गोष्टी असतात, जिथे आपण काही करणे गरजेचे असते,आपण जिथे काही तरी करु शकतो, परंतु नुसती बघ्याची भूमिका घेतली जाते, आणि पर्यायाने नुकसान होते.
पारतंत्र्य उघड्या डोळ्यांनी बघून किती लोकांचे रक्त खवळले हो, मुर्दाड लोकांमुळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इतकी वर्षे लागली आहेत.वाहन लावण्यासाठी 
सावली नाही अशी ओरड करतांना,आपण एखादे झाड लावले पाहिजे असा विचार का नाही करत? 
आपण काही उपाय करत नसू तर नुसत्या नपुंसक तक्रारी करुन काय उपयोग, नुसत्या वल्गना! जिथे कुठे काही चूकीचे कानावर पडले किंवा डोळ्यांना दिसते आहे, तिथे त्यामध्ये लक्ष घातले पाहिजे.मला काय करायचे, ते माझे काम नाही,असे नामानिराळे राहणे योग्य नाही.
आपल्या थोड्याशा मध्यस्थीने अनर्थ टळत असेल,न्यायाची बाजू आपणास माहीत असूनही आपण फक्त तमाशा बघायचा ,असली वृत्ती घातकी आहे.
सावधगिरीने अनेक अनर्थ टाळता येऊ शकतात.इतरांच्या आपण उपयोगी पडले तर ते वावगे नसते.कुणी भर उन्हात पायी चालले आहे, आणि एकटे कारमधून चाललो आहोत, तरीही आपण जर त्या
व्यक्तीला कारमध्ये जागा देत नसू,तर आपण मनुष्य आहोत का,याचा शोधही घेतला पाहिजे.
आपण बघतो , परंतु बघून काय करतो हा खरा प्रश्न आहे.जिथे आपल्या किंचित मदतीने एखाद्याची मदत होऊ शकते,मग ती का करु नये?नाली तुंबली म्हणून ओरड करायची परंतु नालीत पडलेला दगड बाहेर काढायचा नाही हीच संस्कृती आहे का?
एखादा रडत 😭 असताना,साधे त्यास ,तु का रडतो आहेस, हे विचारण्याची तसदी घेऊ नये.आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी, 
मानवी कल्याणासाठी घालवलेले माणसे बघितली तर लक्षात येईल, नुसते बघत बसायचे नसते, काही तरी कृती करायची असते.हे माझे काम नाही,मी एकटाच का करु,इतर झोपलेत काय,असा त्रागा करुन हात झटकता येणार नाहीत.
डोळ्यासमोर अन्याय, अत्याचार होत असताना शेपूट घालून बसणे कितपत योग्य आहे? असे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले असते? सर्व संतांनी जे ग्रंथ लिहिले, ते कशासाठी? पुरस्कार मिळावा,आपले नाव व्हावे,दोन पैसे कमावण्यासाठी? नाही, मानवी कल्याणासाठी.त्यांना बघून गप्प बसणे जमले नाही.महात्मा फुले,डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी का म्हणून समाजासाठी काम केले, त्यासाठी संवेदनशील मन लागते,तळमळ लागते.
माझ्या हद्दीत काही अन्याय होत असेल,कायद्याचे उल्लंघन होत असेल,गुंडांचा नंगानाच असेल तर ते मी सहन करणार नाही,हा बाणा संबंधित ठाणेप्रमुखाचा असला पाहिजे.माझ्या शाळेतील विद्यार्थी हा आदर्श असला पाहिजे,त्याचे गैरवर्तन बघून शिक्षकांना वाईट वाटले पाहिजे,त्यावर उपाय केला पाहिजे,हल्लीची मुले खुप बिघडली हो,असे बोलून चालणार नाही.नेते लोकांनी भाषणातून गरीबांची वाईट स्थिती सांगू नये,तर त्यासाठी काय करु शकता ते करा.
हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे पण कुणी?
कुटुंबात देखील नुसती बघ्याची भूमिका घेणारे असतात.आपली मुले काय करतात हे माहीत असूनही काहीही न करणारे पालक असतात.कुटुंबात एखादा सदस्य आजारी असेल, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
कुणी दुःखी असेल तर नुसत बघत बसायचे का? 
आजपासून बघ्याची भूमिका सोडून द्या, आणि आहे त्याठिकाणी काही चूकीचे वाटत असेल तर विरोध करा.तुमची मदत हवी असेल तर मदत करा.मध्यस्थी करा.
बघतोस काय....!
                
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.