एका माळेचे मणी !

         एका माळेचे मणी !
समाजातील बहुसंख्य माणसे एकसारखी असतात,त्यांची वृत्ती व आचरण एकसारखे असते.त्यांच्या ठिकाणी असलेले गुण दुर्गुण
एकसारखे असतात.माणसे घरची असो वा बाहेरची ,मित्र असो की शत्रू एक माणूस म्हणून त्यांची प्रवृत्ती एकच असते.अशी फार कमी माणसे असतात,जी सत्य, न्याय, नीती, कर्तव्य ह्याचा विचार करून निर्णय घेतात किंवा आचरण करतात, सामान्यपणे माणसांच्या ठिकाणी असलेली  प्रवृत्ती सारखीच असते.
बसमध्ये जागा धरण्यासाठी  वृद्ध माणसे,स्रिया,बालके, शिक्षित, अशिक्षित सर्व धडपडत असतात.किती माणसे अशी असतात की बसमध्ये उपलब्ध असलेली जागा आणि प्रवासी संख्या बघुन शांतपणे बसमध्ये चढतात? किती लोकांना असे वाटते की वृद्ध आणि महिलांना अगोदर बसू द्यावे? संयम, धैर्य किती लोकांकडे असते?
काही अपवाद वगळता सर्व माणसे सारखीच असतात, एकाच माळेचे मणी असतात.
एखाद्या सरकारी कार्यालयातील सर्वच कर्मचारी चिरीमिरी घेतात.भ्रष्टाचाराची देखील एक साखळी असते,माळ असते.माळेतील सर्व माणसे सारखी असल्याशिवाय त्यांच्यामध्ये एकी किंवा समानता असल्याखेरीज त्यांचे मनसुबे तडीस जात नाहीत,जशा डाकूंच्या टोळ्या असतात,ते सर्व क्रुर वगैरे असतात, सारखेच
ध्येय आणि प्रवृत्ती घेऊन असतात, त्यामुळे त्यांची ताकद तयार होते,काम चूकीचे असले तरी एकत्रितपणे केले जाते.
कुणावर विश्वास ठेवावा अशी माणसे आता दिसत नाहीत,कारण सर्वच माणसे सारखी वागत आहेत,कुणी अपवाद असेल तर तो एकाकी पडतो.
रस्त्यावर एखादा खड्डा असतो, हजारों माणसे तो चुकवून ये जा करतात, शिव्या देतात, परंतु एखादी व्यक्ती असते,जो तो खड्डा बुजवून टाकतो.परंतू इतर हजारों माणसे एकसारखी वागणार.
सार्वजनिक मालमत्तेची काळजी न घेणे,घाण करणे, नुकसान करणे हे दोष बहुतेक माणसाच्या ठिकाणी असतात.
समाजातील अशा अनेक अनिष्ट रूढी परंपरा आहेत की ज्या कालबाह्य,अघोरी, अनिष्ट आहेत, परंतु त्यांचे पालन करणारे
मोठ्या संख्येने आहेत,ती सर्व माणसे सारखी आहेत,ती चूकीची जरी असली तरी संख्या महत्त्वाची आहे.
सत्यासाठी, न्यायासाठी, स्वातंत्र्यासाठी झटणारी माणसे अपवाद असतात.त्यागी,संयमी,विवेकी माणसे अपवाद असतात.चूकीचे काम देखील जेव्हा सर्वच करतात, तेव्हा ते बिनदिक्कत चालते.
समाजसुधारक,विचारवंत हे समाजाला मार्गदर्शन करत असतात, परंतु एका माळेचे मणी त्यांचा विरोध करतात.समजा सर्वच दूधवाले दूधात पाणी टाकत असतील तर तक्रार करायची कुणाची, कुणाकडे?
एका खोटारड्या माणसाची तक्रार दूसऱ्या खोटारड्याकडे करुन काय उपयोग?
जशी साड्यांची आवड नसलेली बाई शोधणे कठीण,बायांचीआवड नसलेला पुरुष सापडणे कठीण.सरकारी अधिकारी असून पैसे खात नाही,असा अधिकारी दुर्मिळ.राजकारणी असून खोटे बोलत नाही,असा पुढारी अपवाद.दुकानदार असून भेसळ करत नाही,असा दुकानदार शोधा.
भाऊ असून भांडत नाही,असा भाऊ नाही.
शेजारी असून निंदा करत नाही,असा शेजारी दुर्मिळ! 
आपल्या कामासाठी वशिला लावत नाही,असा माणूस नाही.मालक असून शिव्या झाडत नाही,असे होत नाही.किर्तनाचे पैसे घेत नाही,असा महाराज नाही.चिडचिड करत नाही,असा कारकून नाही.
सर्व ठिकाणी माणसे जवळपास एकसारखी असतात.एकाच माळेचे मणी असतात, त्यापैकीच एक मणी होऊन राहायचे की आपण अपवाद व्हायचे, हे ज्याचे त्याने ठरवायचे.  

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.