दिसणं आणि असणं

     दिसणं आणि असणं
मी एकदा मित्राच्या कारमध्ये चाललो होतो.उन्हाळ्याचे दिवस होते. काचा बंद.उकडू लागले.मी काच खाली करू लागलो.त्याने मला थांबवले आणि म्हणाला,काच खाली घेतला तर लोकांना वाटेल ए.सी. नाही! मी अवाक झालो.
लोकांचे इतके भय?
 दिसतं तसं नसतं,असेच लोकांना वाटत असते, लोक आपण काय दाखवतो यापेक्षा काय लपवितो हे बघत असतात.
 लोक म्हणजे तरी कोण? आपणही लोकांसाठी लोकच आहोत. लोक काय म्हणतील हि बहुधा चिंता असते.
 जेवणाच्या पंगतीत ताटातली जिलेबी तोंडात टाकली की सगळे तिकडे बघतात, जसे आपण इतरांना नावे ठेवण्याची संधीच बघत असतो.
बऱ्याच ठिकाणी मुलगी बघायला जातांना मित्राचे चांगले कपडे घालून जातात.
एवढेच काय चप्पल पण!
हा सर्व खटाटोप कशासाठी? मी अनेक स्रियांना इतर स्रियांचे दागिने घालून समारंभात जातांना बघितले आहे.
आपले जे नाही ते आपले सांगितले जाते.
अनेक थाटात वावरणारी माणसे भामटी असतात. दिखावा करण्याची त्यांची सवय असते. इतरांना भूरळ पाडण्यासाठी ते असले वरकरणी उपाय करत असतात.
अत्यंत कडक कपड्यात वावरणारी माणसे कंगाल असतात.दाढी मिशा वाढवून इतरांवर छाप टाकणारी
 माणसे भित्रे असतात. अनेक निर्लज्ज स्त्रिया अति लाजण्याचे सोंग करतात. निर्बुद्ध माणसे फार विद्वान असल्याचा अविर्भाव दाखवतात.समाजाचे शोषण करणारे समाजसेवक असल्याचा टेंभा मिरवतात. भोगी त्यागी असल्याचे भासवतात.मूर्ख विद्वानाचा उदोउदो करतात.भित्रे शुरांचे गुणगान गातात.
खोटारडे
सत्याचे पाईक दाखवतात.
आपण जे नसतो आणि जसे नसतो तसे भासवण्याची गरज नाही. हा न्युनगंडआहे.
कमी सांगितले तर कमी लेखतील या भयातून  त्याचा जन्म होतो.आपण कुणालाही कमी लेखू नये तरच हा दंभ कमी होईल.नसता जगण्यातला 
सहजपणा हरवून जाईल.गावाकडे
माझ्याकडे मित्र आले होते. मी त्यांना गोधडीवर बसवले. त्यावेळेस गोधडी अंथरलेली होती.कुणीतरी लगबगीने ती.गोधडी उचलू लागले आणि गादी आणू लागले. गोधडीची लाज वाटणे हा भाग.
हि मानसिकता बदलली पाहिजे. आम्ही साधी माणसे, आम्ही गरीब माणसं, आम्ही अडाणी माणसे असले विधान करण्याची गरज असू नये.
 आपण जे नाहीत, जितके आणि जसे नाही तसे दाखविण्याचा किंवा भासविण्याचा प्रयत्न फोल असतो.वाघाची
कातडी पांघरूण कुणी वाघ होत नसतो.आपल्यामध्ये जे नाही, आपल्याकडे जे नाही, ते नाही म्हणण्याचे
शिकले पाहिजे.पोकळ ऐट कमी केली पाहिजे.आहे ते दुर्गुण सहज मान्य केले पाहिजे.जे मुद्दाम दाखवले जाते, ते कमी असते.हत्तीला आपले वजन मिरवावे लागत नाही,जे जात्याच असते ते दाखवावे लागते नाही, कोकिळा कुणासाठी गात नाही, स्वभावानुसार असले पाहिजे, काही वेगळं दाखवणे म्हणजे ते आपल्याकडे जात्याच नाही असा त्यांचा अर्थ होतो.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.