चौफेर जीवन
- ना.रा.खराद
आपले जीवन म्हणजे फार मोठी गंमत आहे, परंतु ती आपणास मिळवता येत नाही.जीवनाचे अनेक पैलू आहेत, ते आपणास उलगडता आले पाहिजे.
एककल्ली, एकांगी जीवन खूप नीरस होऊन जाते.कोणता तरी एकच व्यवसाय किंवा एकच छंद पुरेसा नाही.
फार काळ एकाच जागेवर राहून इतक्या अफाट पसरलेल्या जगाची ओळख कशी होणार, समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन त्याचे तुषार अंगावर घेण्याचा आनंद का घेऊ नये.कधीतरी अंगणात येऊन आकाशाचे निरीक्षण का करु नये.अमूक आवडते, तमूक आवडत नाही,असे तुसडे
जीवन का जगावे.लाखों करोडो लोक जगात आहेत,मग का पाच पन्नास लोकांत गुरफटून पडायचे.
आपण आपल्या भोवती किती भिंती उभा करतो,किती कुंपणे घालतो.एखादे पद किंवा बिरुद चिकटले की ते आयुष्यभर निघत नाही.बाह्य लक्तरे फेकून देता आली पाहिजेत,निखळ माणूस म्हणून जगता आलं पाहिजे.
घड्याळाची काटे जशी चौफेर फिरत असतात, तसेच जीवन देखील चौफेर असले पाहिजे.संपूर्ण ब्रम्हांड पादाक्रांत करण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे,मग का
म्हणून अडकवून घ्यायचे विशिष्ट ठिकाणी.
अमूक गोष्ट करतो म्हणून तमूक करु नये किंवा हे जमतं म्हणून ते शिकू नये असे मूळीच नसते.
निसर्गाचे एक अव्याहत संगीत सुरू असते, त्याच्या लहरी जर आपणास रोमांचित करत नसतील,तर आपण करंटे आहोत.बदलत जाणारे निसर्गचित्र न्याहाळले पाहिजे.अहोरात्र वाहणाऱ्या नद्या कोण बघणार.खळखळणारे झरे का उगीच वाहतात.हा सगळा पसारा आपल्या आनंदासाठी आहे,तो आनंद मिळवता आला पाहिजे.आपले परके असे काही नसते, जितके जग आपण कवेत घेऊ तितके आपलेच असते.
जीवन सर्वांगिण, परिपूर्ण असले पाहिजे.
या अमर्याद विश्वात मर्यादा सोडल्या शिवाय चौफेर जीवन जगता येत नाही.सर्व बंधनं लादलेली असतात, आदर्श तकलादू असतात, एकदा ओसंडून वाहिले की जीवन पूर्णतृप्त होते.पथ्य किती पाळणार , शिष्टाचाराचे ओझे किती वाहणार,थोडे तरी सैल व्हा,मोकळे व्हा , झुगारुन द्या सर्व ,स्वैर व्हा !