न्यूनगंड, म्हणजे स्वतःला कमी लेखणे.तो खुप लोकांच्या ठिकाणी दिसून येतो.
यामुळे उत्साह नष्ट होतो.काळजी,चिंता याने मनुष्य ग्रसित होतो.आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे ही भावना किंवा समज मूळी चूकीचा असतो.
आपणास स्वतः मधली जमेची बाजू शोधता आली पाहिजे किंबहुना
त्याची जाणीव आणि महत्व असले पाहिजे.
इतरांनाच मोठे किंवा श्रेष्ठ समजत राहिल्याने आपल्या ठिकाणी जे दिव्य आहे त्याची प्रचिती आपणास येत नाही.अंहकाराइतकाच न्यूनगंड भयंकर असतो.स्वत:च तोंडावर मारावे असा हा प्रकार असतो.कुणाला कमी लेखणे जसे चूकीचे तसेच कुणाला फार मोठे समजणे
देखील चूकीचे आहे.
जिकडे-तिकडे न्यूनगंडाने पछाडलेली माणसे दिसतात.
आम्ही अज्ञानी, आम्ही गरीब , आम्ही अडाणी असे काहीतरी खुळ घेऊन जीवन कंठतात.हे दब्बू जीवन सोडून दिले पाहिजे.नम्रता असावी परंतु दबणे नसावे.
जो हक्काचे ,कष्टाचे खातो त्याने दबण्याचे काय कारण?
ताठ मानेने जगण्याची सवय पाहिजे.कुणी श्रीमंत आहे म्हणून स्वतःला गरीब समजण्याची गरज नाही.आपला स्वाभिमान हिच खरी श्रीमंती.
प्रत्येकाच्या ठिकाणी असीम अशी शक्ती आहे.इतरांपेक्षा तुम्ही कमी नाहीच मुळी.डोळ्यातले तेज, स्वरातील करारीपणा कमी होऊ देऊ नका.लहान सहान फायद्यासाठी कुठेही लाचार होऊ नका.मी दूबळा,असे रडगाणे गात बसू नका.उठा,पंख पसरा गरुडझेप घ्या.मनावरचे जळमटे पूसून टाका.कष्टाची भाकरी खा,आपल्याच मस्तीत जगा.कुणाच्याही मोठेपणाखाली
दबू नका.त्याचे तो जगतो, तुमचे तुम्ही जगा.
जो सूर्य त्यांच्या डोक्यावर आहे,तो तुमच्याही डोक्यावर आहे.कशाला उगीच कुणाला मोठे समजता.लक्षात ठेवा, तुम्ही जितके स्वतः ला कमी लेखाल जग तुम्हाला त्यापेक्षा जास्त कमी लेखेल.कुणाचीही तमा बाळगू नका.
तुलना करु नका.आहे तसे आणि आहे त्याठिकाणी तुम्ही
श्रेष्ठ आहात.
वटवृक्षाकडे बघून एखादे झूडूप रडत बसत नाही.गरूडाचे उडणे बघून ,जमीनीवरचे कीडे चालणे सोडत नाही.क्षणात नष्ट होणारी फूलपाखरं किती स्वच्छंदी असतात.
इतरांची आरती बंद करा.स्वत:ची आरती सुरु करा.तुमच्या ठिकाणी असलेल्या ईश्वराराचा आदर करा.तुमच्यात तो विद्यमान आहे,त्याचा अपमान करु नका.
जो तुम्हाला चालवतो,बोलवतो,झोपवतो ,जागवितो तो तुमच्या ठिकाणी आहे.त्यास बाहेर शोधू नका.आत्मा हाच परमात्मा आहे हे विसरु नका.
कुणालाही तुच्छ लेखू नका त्यासोबतच स्वतः ला तर मूळीच कमी लेखू नका.गर्व करु नका परंतु न्यूनगंड तर
बाळगूच नका.तुम्ही राजा नसले तरी राजाप्रमाणे जगा.
कुणी राजा आहे म्हणून स्वतःला भिकारी समजू नका.
भौतिक समृद्धी नसली तरी चालेल परंतु डोळ्यात असं तेज हवं की , समृद्धी काय असते हे लक्षात आले पाहिजे.
सगळी लक्तरे फेकून द्या.चला उत्साहाने जगा!