कोण काय करते?

                 कोण काय करते?
                          -   ना.रा.खराद
 हे जग म्हणजे कर्मस्थळ आहे, इथे प्रत्येकजन सतत काहीतरी करत असतो, काही न करणे म्हणजे आराम आणि आराम देखील कर्म आणि म्हणून आपण,तो आराम करतो आहे,असे बोलतो.
  या जगात अंदाजे सातशे कोटी लोक राहतात, लहान बालके ते अतिवृद्ध सर्वच कोणत्या न कोणत्या कामात गुंतलेले असतात, जीवन म्हणजे गुंतलेले असणे होय.कुणी बसले तरी लोक विचारतात,का बसला? काहीतरी कारण सांगावेत
लागते.जिकडे तिकडे धावपळ दिसते.माणसे व्यस्त दिसतात,कशात आणि कुणात तरी अडकलेले दिसतात.तिढा आणि गुंता सोडवण्यात
आयुष्य खर्ची जाते.
  एकाच ठिकाणी अनेक माणसे अनेक कामे करताना दिसतात.घरात देखील वेगवेगळ्या कामांत सदस्य गुंतलेले असतात.सुईमध्ये दोरा ओवणे असो की दोऱ्याचा गुंता उकलणे असो, कामात असलेल्या माणसांना चांगले समजतात.
स्त्रिया घरामध्ये वेगवेगळ्या कामांत गुंतलेल्या असतात.लहान मुलं त्यांच्या बाळबोध कामात असतात.काहीच करत नाही,असा मनुष्य दिसत नाही, चूकीचे का होईना परंतु खटपट कुणाचीच बंद नसते.
 कुणी काय करावे,हा ज्याचा त्याचा छंद,गरज , अगतिकता.अगदी क्षुल्लक समजले जाणारे काम
देखील काम असते.ते जगण्याचे प्रयोजन असते.कुठे एकजण अनेक कामे करतो तर कुठे एक काम अनेकजण करतात.
  कामाशिवाय जीवनात वेळ जाऊ शकत नाही.लहानसहान कामे करण्यात आनंद मिळतो.आपण काही तरी करतो आहोत ही मानसिकता जगण्याचे बळ देते.
 कुठे खड्डे खोदणे सुरू असते तर कुठे ते बुजविण्याचे काम सुरू असते.कुठे अंत्ययात्रेची तयारी सुरू असते तर कुठे बारशाचा कार्यक्रम सुरू असतो.कुठे मारण्याचा प्रयत्न तर कुठे वाचवण्यासाठी प्रयत्न असतो.
 जन्माला आलेल्या प्रत्येकाला कर्म करावे लागते.ऐतखाऊ माणसाला शुद्धा अनेक कामे करावीच लागतात.कुणी भेटले की विचारतो, काय चालले? कर्म सातत्याने चालते.एक संपले की दूसरे काम करावे लागते.
  कुणी अभ्यास तर कुणी व्यायाम करतो.चोर चोरी करतो, पोलिस चोरांना शोधतो.ज्याच्या वाट्याला जे कर्म आले ते तो करत असतो.काही नित्याची दैनंदिन कामे असतात,ती उरकावीच लागतात.काही कामे करावीच लागतात तर काही ऐच्छिक असतात.
 मुलं सांभाळणं, घरकाम, बागकाम असो की विमानातील हवाई सुंदरी असो, सिनेमातील नटी असो की इतर लोक काम करत असतात.कुठे बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे ‌.लागलेली आग विझवणे सुरू आहे.कुठे बोलण्याचे तर कुठे ऐकण्याचे काम सुरू असते.
सृष्टी देखील कामात गुंतलेली असते.सर्वच जीव 
कर्म करतात.झोप देखील कर्म आहे.
   विविध कर्मांची इथे नांदियाळी आहे.चिऊताईचे
दाणे टिपणे असो की हत्तीचे लाकडे फोडणे असो.गरुडाची उंच भरारी असो की, माशांची डूबकी सर्व कर्मे अहर्निश सुरू असतात.आपले स्वतःचे कर्म सुरू असताना, इतरांचे ,इतर जीवांचे शुद्धा कर्म , त्यांच्या हालचाली बघितल्या पाहिजे, हे एक वेगळे कर्म आपण केले पाहिजे.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.