- ना.रा.खराद
आपल्या व्यक्तिगत आयुष्यात खेदमुक्त असणे खूप अगत्याचे आहे,कारण ते आयुष्याचे समाधान आहे.अपेक्षा, आक्षेप, तक्रारी ह्याने ग्रसित व्यक्ती आपले मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो.सततचा खेद हा मानसिक आजार आहे,खेदरहित जीवन हे समाधानाचे असते,खेद एकप्रकारे दुःख आहे.
सतत काहीतरी कमी असल्याचा भास होणे, ह्यातून खेद उत्पन्न होतो, किंवा आपल्यावर अन्याय होत आहे,हा विचार मानसिक अस्वस्थता निर्माण करतो.खेद असा विविध मार्गांनी मनात प्रवेश करतो,ठान मांडून बसतो आणि आपणास त्याची चाहूलही नसते.
खेदरहित जीवन हे एक उत्तम जीवन आहे.कुणाविषयी काही तक्रार नसणे, कुणाकडून काही अपेक्षा नसणे, आहे त्याचा स्विकारण्याची तयारी असणे ही साधी गोष्ट नाही, कित्येकांना हे कधीच साध्य होत नाही.
स्वतःच्या मनात तळ ठोकून बसलेला खेद,
हा जवळचा शत्रू आपणांस दिसत नाही, आणि इतर कुणाला तरी आपण त्यास कारणीभूत धरतो.
सहनशीलता, सौजन्यशीलता, उदारता हे गुण असल्याखेरीज खेद दूर होत नाही.खेद हा एक दोष असून तो काहीवेळा गुण म्हणून मिरवला जातो.या जगात आपल्या मनासारखे काहीच चालत नसते, कित्येकवेळा सर्वकाही मनाविरुद्ध असते, हे लक्षात घ्यावयास हवे की ते कुणाच्या तरी मनाप्रमाणे चाललेले असते.इतरांचे समाधान हे आपले असमाधान ठरु नये, यासाठी खेद दूर सारला पाहिजे.खेद हे एक हळूवार विष आहे,त्याचे वाईट परिणाम ठरलेले आहेत.
आपणास सर्वकाही इतरांमध्ये वाईट दिसते, आपण वाईट ,अज्ञानी वगैरे नाहीतच अशी आपण खात्री बाळगतो.इतरांच्या ठिकाणी सर्व दोष आहेत,असे समजल्याने खेद बळावतो.आपणही चूकीचे वागतो असे समजले तर खेद कमी होतो.
खेद हा कायम सोबतीला असतो.जाणार तिथे तो डोके वर काढतो, प्रत्येक गोष्टीत चूका काढणे,नाव ठेवणे,निंदा करणे, आक्रस्ताळेपणा करणे खेदाची लक्षणे आहेत.
तर चला, आपण खेदरहित जीवन जगूया!