अवघाचि संसार....
- ना.रा.खराद
कुणा एका संताचे,' अवघाचि संसार सुखाचा करीन.' हे वचन वाचण्यात आले आणि मी स्तब्ध झालो.अवघाचि संसार म्हणजे संपूर्ण जग! किती विशाल हृदय असते संताचे.स्वत: हालअपेष्टांचे जीवन वाट्याला आले असतांना जगाला सुखी करण्याचा विचार करणं कसे शक्य होत असेल या संतांना?
जगाच्या कल्याणासाठी झटणारे असले संत
जगाच्या कानाकोपऱ्यात दिसून येतात.शेतात राबणारे हात जसे जगाला जगवितात तसे त्याच हातातील लोककल्याणासाठी झिजणारी संतांची लेखनी विचारांची शिदोरी जगाला वाटत असते.जगण्यासाठी जसे अन्न लागते तसे
विचार देखील.अन्न जगविते आणि विचार
जागविते.
संत जगाला सुखी करण्यात किती यशस्वी झाले ,हा विषय चघळत बसण्यापेक्षा , त्यांनी जगाला सुखी करण्याचा चंग बांधला आहे हे महत्त्वाचे!
जग विस्ताराने कितीही मोठे असले तरी, विचारांची शिदोरी घरोघरी पोहोचता येते.
हे जग विचारवंतांनी उभे केले आहे.अमानवीय गोष्टींपासून मानवाला दूर ठेवण्याचे पुण्यकर्म जगातील विचारवंतांनी, तत्वज्ञानी लोकांनी केले आहे.
युद्धाच्या मैदानावर देखील हे विचार श्रीकृष्ण सांगतो,तेच तत्वज्ञान आज संपूर्ण जगभरात पसरले आहे.कित्येक विदेशी विचारवंतांच्या विचारांचा प्रभाव भारतियांवर आहे.विचारवंत संकुचित नसतात.देशांच्या सीमा विचार थांबवू शकत नाहीत.जगाच्या कल्यांना संतांच्या विभूती, उगीच नाही.
भारतीय राज्यघटनेची निर्मिती देखील एका
महान विचारवंतांची आहे.जगाला विचारांची
शिदोरी वाटून जगभर ज्यांनी लोकांवर गारुड केले तेही विचारवंतच.आपल्या प्रखर व विद्रोही विचारांनी ज्यांनी अवघे जग हादरवून सोडले ते आचार्य रजनीश जगावर प्रेम करणारेच.' जगाला प्रेम अर्पावे' अशी आजर्व करणारे साने गुरुजी .कामगारांच्या व्यथा मांडणारे कार्ल मार्क्स देखील जगाला सुखी करण्याचा प्रयत्न करत होते.
जो इतरांना सुखी ठेवतो, इतरांना दुःखी बघू
शकत नाही,तोच खरा संत होय.संताचे केवळ अनुयायी असून चालत नाही.विचारांच्या गुढ्या उभारल्या जाव्यात,प्रेमाचे तोरण बांधले जावे.मानवतेचा ध्वज फडकला पाहिजे.
इतरांना आपल्यामुळे सुख मिळाले पाहिजे, इतरांना आपल्या काया,वाचा, मनाने दुःख
देऊ नये.कटू वचन तर मूळीच बोलू नये.कुणाला अपमानास्पद वागणूक देऊ नये.
अवघाचि संसार सुखाचा तेव्हाच होऊ शकतो , जेव्हा आपण आहे त्या ठिकाणी जगाला प्रेम देऊ.प्रेम दिल्याने लाभते. स्वतः सुखी व्हायचे असेल तर इतरांना दुखवू नका.