- ना.रा.खराद, पैठण
माझ्या शालेय जीवनात ज्या विषयांची मला विषय वासना नव्हती ते विषय जे मला विषाप्रमाणे वाटायचे इतिहास आणि भूगोल! इतिहास आणि भूगोलची युती कधी तुटलीच नाही.माझा या विषयाचा इतिहास नेहमी भूगोलवर थांबला आहे.एस.टी.मध्ये कशीबशी जागा मिळावी तसा मी गुपचूप या विषयात पास झालो आहे.
इतिहास आणि भूगोल विषयाचे शिक्षक मला कायम शत्रू वाटत आले आहे.इतिहास म्हणजे जून्या गोष्टी उकरून काढून सांगायच्या आणि मी आजचा विचार करणारा
माणूस, मला ते कधीच आवडले नाही.ई.पू.चे कोडे अजून उलगडलेले नाही.काल परवा काय घडले हे न सांगू शकणारा मी, चड्डीची नाडी नीट न बांधता येत असताना, सिकंदर वगैरेंची आक्रमणे खूपच डोक्यावरून फिरायची,पण मास्तरांच्या धाकांनी आम्ही ते गिळंकृत करून घ्यायचो.
इतिहास शिक्षक आमच्या डोळ्यासमोर इतिहास उभा करायचे तेव्हा आम्ही आडवे व्हायचो.सिंकदरने आक्रमण कधी केले यापेक्षा,आपली बस हुकणार तर नाही ना हा विचार आमच्या उभयतांच्या मनात धुडगूस घालायचा.
इतिहासाचे शिक्षक देखील आपल्या तालुक्याचा देखील इतिहास माहीत नसताना
अख्या जगाचा इतिहास सांगायचे.पुरातत्व वगैरे शब्द तर आम्हाला शाळा सोडेपर्यत कळले नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हे कळायचे.
इतिहास हजारो वर्षे जूना आणि आम्ही दहा बारा वर्षे वयाची पोरं, आम्हाला कधीच काही कळलं नाही आणि न कळताही शिक्षण पूर्ण करता येते हे कळल्यावर कळले.
भूगोल विषयाने तर थैमान मांडले.इतिहासासोबत हा विषय का असतो असा प्रश्न कधी कुणी का विचारत नाही, हा प्रश्न मला पडतो.भूगोल हा अभ्यासाचा विषय मला कधीच वाटला नाही, म्हणून माझ्या वाट्याला अनेक वेळा गोल आला आहे.
जगभरातील सर्व नद्या वगैरेची माहिती मला मिळवणे कधी गरजेचे वाटले नाही.गावच्या ओढ्याला आलेले पाणी आणि त्याची गावभर चर्चा हेच माझे भौगोलिक ज्ञान होते.
आमचे भूगोलाचे शिक्षक मी या विषयात
' ढ' असल्यामुळे मला प्रश्न विचारले जायचे.इतर मुले कळलेले नसताना देखील कळले असे दाखवायचे, त्यामुळे ते सुटायचे.
भूगोल हा खूप सोपा विषय आहे,असे बाहेर लोक बोलायचे.तो पेपर नेहमी शेवटी असायचा त्यामुळे ते पटायचे देखील, परंतु मी ते कधीच अनुभवले नाही.समुद्राची माहिती लिहिता नाही आली म्हणून काठावर पास झालो आणि इतिहास तर माझे हसू केले.
इतिहास आणि भूगोल हे जेवणातील त्या पदार्थासारखे आहेत जे फक्त ताटात असतात, परंतु कुणी खात नाही.