आदरणीय गुरुजी,

आदरणीय गुरुजी,
आज ‘शिक्षक दिन'  तुमची आठवण 
येणार नाही हे तर नवलच!
बालवाडी ते एम.ए.बी.एड.
किती गुरुंचे मार्गदर्शन लाभले मला
मी आपला कृतघ्न कसा होऊ शकतो
बालवाडीत कोऱ्या पाटीवर क,ख,ग गिरवतांना आपण घट्ट बोट पकडून
मला लिहायला शिकवले
मायेने पकडलेल्या त्या बोटांचा स्पर्श
 अजूनही अक्षर बनून फिरत आहे
आम्हाला त्यावेळी वर्गात असले की
स्वर्गात असल्याचा भास होत असे
शाळेच्या घंटेचा तो निनाद आजही
कानी घुमतो आहे
मंदिराच्या घंटीइतकाच तो आम्हाला
पवित्र वाटत असे
गुरुजी, तुम्ही वाचायला शिकवले तेव्हा
जोडाक्षरे उच्चारताना किती कठीण वाटायचे, परंतु पुढे तेही सोपे केले
आईवडिलांच्या बद्दल आपणच आम्हाला
जाणीव करुन दिली व त्याचबरोबर
इतर मानवांशी कसे वागावे हे शिकवले
शिकवले तुम्ही देशावर प्रेम करायला आणि
देशसेवेसाठी वाहून घ्यायला
सत्य बोलणे शिकवले तुम्ही
न्यायाने वागणे, नम्रतेने बोलणे शिकवले तुम्ही.
गुरुजी,जगाला प्रेम अर्पावे ही शिकवण तुमची, किती मनोभावे प्रार्थना तुम्ही गात असत,
आजही तो स्वर कानी पडतो आहे
आपली ती साधी राहणी,उच्च विचारसरणी
आम्हाला आजही भूरळ घालते आहे 
आपल्या डोळ्यातील तेज व आवाजातील माधुर्य आमच्यासाठी तेजोपर्व होते
भावूक होतांना आपला दाटून येणारा कंठ
आम्हा मुलांचे ह्रदय पिळवटून टाकत असे
गरीब मुलांच्या खांद्यावर हात ठेवून 
आपण त्यांची विचारपूस करायचे तेव्हा खूप आधार वाटायचा, 
शाळेत येण्याची ओढ खुप असायची.
गुरुजी, एकदा मी आजारी होतो तेव्हा मला
घरी भेटायला आले होता आणि येताना माझ्या आवडीचा खाऊ आणि एक गोष्टीचे पुस्तकही आपण  आणले होते
खरे सांगू, इतके प्रेम मला कधीच , कुणाकडून भेटले नव्हते
आपण रोज दिलेल्या सुविचाराने आमचे
जीवन घडले,ते सुविचार आजही माझ्या संग्रही आहेत.
गुरुजी,आपण आमच्या सोबत जेवण करायचे , आपल्या डब्यातील चांगले काही गरीब मुलांना देऊन त्याची कोरडी भाकरी खायचे
हे संस्कार पुढे आम्ही कायम ठेवले.
आपल्या स्वाभिमानी, कणखर, बाणेदार
वृत्तीचा कित्येकवेळा अनुभव आला आहे.
आपल्या तत्वांशी तुम्ही कधीही तडजोड
केल्याचे दिसले नाही.
आपले प्रचंड वाचन, आमच्या खुप उपयोगी
पडले, शाळेतील ग्रंथालय आपण सुसज्ज
व अद्ययावत ठेवले.
आपल्या घरी आम्ही आलो तेव्हा, घरात
जिकडे तिकडे पुस्तके दिसली,खरेच आपण
ज्ञानाचा उपयोग आमच्यासाठी केला व
आमचे जीवन समृद्ध केले.
गुरुजी ,शालेय शिक्षण संपले तेव्हा
निरोप समारंभात  आपण अश्रू थोपवू
शकला नाहीत,आपले ते प्रेम आम्ही डोळ्यात साठवलेले आहे
आज शिक्षक दिन , आपल्या आठवणी जाग्या झाल्या,आपले उपकार मी कधीही विसरू शकत नाही.आपल्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो.
                               आपला विद्यार्थी
                               नारायण खराद
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.