भाषणे आणि वक्ते

            भाषणे आणि वक्ते
                                     - ना.रा.खराद

  हल्ली भाषणांचा सुकाळ आहेत, जिकडे तिकडे कार्यक्रमाची रेलचेल आहे, मुख्य अतिथी, प्रमुख पाहुणे, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ह्याचे स्तोम माजले आहे.प्रसिद्ध वक्ते... वगैरे असलेले श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत आहेत, टाळ्यांच्या सुकाळ आहे.परतू अनेक गंमती जमती घडतात.
 भाषणाचा विषय, उपलब्ध वेळ आणि श्रोत्यांचा स्तर आणि मानसिकता न बघता भाषणे ऐकवली जात आहे.संचालन करणारा तर आपण सर्वस्व असल्याच्या तोऱ्यात असतो.अधुन मधून चारोळ्या,शेर वगैरे ठोकत टाळ्या मिळवू पहातो.
 प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष वगैरे कोण हे माकड असा चेहरा करून बसतात.तुबंळलेले वक्ते संचालकांच्या वाटमारीला पार कंटाळले असतात, परंतु श्रोत्यांच्या खट्याळ टाळ्यांच्या गर्भित अर्थ त्यास उमगलेला नसतो.वक्त्याबद्दल अतिरंजित विधाने करणे ,त्यास हरबऱ्याचा झाडावर चढवणे असा खटाटोप सुरू असतो.
  प्रास्ताविक हा कोणत्याही कार्यक्रमाचा भाग बनला आहे.ओपनर खेळाडू सारखा तो टिकून खेळला तर इतर खेळाडू तगमग करतात.दोन मिनिटांचे प्रास्ताविक चांगले अर्धा तास उरकून, आपण लांबलेले प्रास्ताविक आखडते घेत आहोत,असेही जाताजाता बोलतो. प्रास्ताविकात
इतके काही बोलून जातो की नंतरच्या वक्त्यांना ऐनवेळी आपले मुद्दे बदलावे लागतात.प्रास्ताविकाचे भाषण कधीकधी इतके लांबत जाते की खुणाऊन त्यास थांबवले जाते.
व्यासपीठावरील मंडळी एकमेकांकडे अशी बघते की या मूर्खाकडे प्रास्ताविक का दिले असावे?
  काही वक्ते हौशी असतात, श्रोत्यांवर अक्षरशः तुटून पडतात.आवाज चढवून आणि हातवारे करुन भाषण रेटतात.वेळेचे थोडेही भान न ठेवणारे वक्ते टिकेचे धनी होतात.आपणास प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकायचे आहे, म्हणून मी आटोपते घेतो,असे बोलून आपला संयम व जागरूकता दाखवतात.
   काही वक्ते तर इतके विषयांतर करतात की श्रोते बुचकळ्यात पडतात.काय बिनडोक वक्ता आहे,असे कुजबुजतात.कित्येक वक्ते श्रोते उठून चालले तरी बोलत असतात.काही वक्ते इतर जे बोलले त्यांचे दाखले देत, श्रोत्यांची बोळवण करतात.एखादा वक्ता, बोलण्यासारखे खूप आहे, परंतु वेळेअभावी आटोपते घेतो, म्हणून वेळ मारुन नेतो.काही वक्ते व्यावसायिक असतात, श्रोत्यांच्या टाळ्या कशा मिळवाव्यात ह्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते.
आभार प्रदर्शन हा एक कंटाळवाणा भाग असतो.लोकांना उठायची घाई असते आणि हा आढावा घेतो.कोण काय बोलले चघळतो, त्यामुळे तर श्रोते पलायन करतात.
 काही लग्न समारंभात आशिर्वादाचे दोन शब्द बोला म्हंटले की न जाणो काय काय बोलतात.अगोदरच लग्न घटिका टळलेली असताना , त्यामध्ये आणखी भर.आशिर्वाद देणारा महाराज असेल तर पूर्ण किर्तनच.शोकेसभेतील भाषणे तर खूप शोकपूर्ण 
असतात.मृताचे नको ते गुणगान ऐकावे लागते.शोकाकुल श्रोते निमुटपणे ते सहन करतात.शाळकरी मुलांसमोर दिली जाणारी भाषणे तर खूप बालिशपणाची असतात.वक्ता काय बोलतो हे कळत नसले तरी कसा बोलतो हे मुले बघत असतात.भोवताली मास्तरांनी घेरलेले असते.निमुटपणे ऐकावे लागते किमान गप्प तरी बसावे लागते.शाळेची शिस्त म्हणून बालकांवर दडपशाही केली जाते.वक्त्यांची मात्र हौस भागते.
  भाषणे कुणी,कधी,किती करावीत ,ह्याचे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे.ताळतंत्र नसलेले सुमारे दर्जाचे वक्ते श्रोत्यांचा भ्रमनिरास करतात.लोकांनी ऐकावं असं आपल्याकडे सांगायला काही असावे व लोक ते ऐकतील असं ते सांगितले जावं.
  आपण खरेच वक्ते आहोत का, हे एकदा तपासून पहावे.प्रसंगोचित बोलण्याचे भान आपल्याला असते का ह्याचा मागोवा घ्यावा.
 वक्ता म्हणून आपण कितपत यशस्वी आहोत, नसेल तर तो नाद सोडून द्यावा.नसता तसे कौशल्य प्राप्त करावे, उगीच श्रोत्यांमध्ये आपले हसू करून घेऊ नये.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.