एका साक्रेटिसची गरज...!
- ना.रा.खराद
आपल्या शहाणपणामुळे जगभर गाजलेला माणूस म्हणजे साक्रेटिस! त्याच्याशिवाय जगात कुणी शहाणं नाही, असंही नाही, परंतु त्याने सत्यासाठी आपला प्राण पणाला लावला, म्हणून तो अद्वितीय ठरला.तडजोडीत आयुष्य कंठणाऱ्या आपल्या सारख्या करंट्या लोकांना तो कधीच कळणार नाही.कोण कुठल्या देशातला तो पण जगभर भाव खाऊन गेला.
साक्रेटिस देखील आपल्या सारखाच एक सामान्य माणूस.बरं दिसायलाही काही देखना नाही, उच्चशिक्षित नाही,कुठला अधिकारी नाही, श्रीमंत नाही, तरीही केवळ सत्याच्या बळावर तो सर्वात पुढे गेला आहे,कारण या मार्गावर स्पर्धा नाही,कारण हा मार्ग खडतर आहे, जीवघेणा आहे, म्हणून सत्याची बाजू कुणी मांडत नाही,सत्याचा कैवार कुणी घेत नाही,सत्य एकाकी असते,सत्याचा लढा स्वबळावर लढायचा
असतो, त्यासाठी लागते वाघाचे काळीज,प्राणाची
आहुती द्यायला तयार! आपल्याकडे नसते हे सर्व म्हणून आपण नाही होऊ शकत साक्रेटिस.
साक्रेटिसने आपले मोठेपण लपवले होते, परंतु शहाणपण लपून राहत नाही, अखेर तो गाजलाच.
तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला.तरणांची माथी भडकवण्याचा त्याच्यावर आरोप लागला.
खरे म्हणजे त्याच्या तर्कशुद्ध विचाराने मूर्खांचे माथे भडकले होते, प्रस्थापित, सत्ताधारी आणि ढोंगी लोकांचे धाबे दणाणले होते, त्यामुळे त्याच्यावर खोटेनाटे आरोप करुन त्यास संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि अखेर त्यामध्ये त्यांना यश आले, परंतु मृत्यू नंतर देखील साक्रेटिस अमर आहे, जगातील काही लोकांच्या मनात तो तेवत आहे,या मुठभर सत्यवादी लोकांच्या मतांवर जगाचा गाडा चालला आहे,नसता हे जग कधीच गिळंकृत झाले असते.
आज मानवजातीला साक्रेटिसची गरज आहे.सत्यासाठी आपल्या आयुष्याचे मातेरे करुन घेण्याची, कुणाच्याही कृपेची आशा न बाळगण्याची आणि सत्याशिवाय कुठेच न झुकण्याची बाणेदार वृत्ती असलेल्या सामान्य परंतु असामान्य विचारशक्ती असलेल्या माणसाची गरज आहे.
सत्य जेव्हा बेवारस होते, तेव्हा असत्य धुडगूस घालत असते.खोलीभर अंधार दूर करण्यासाठी खोलीभर दिव्यांची गरज नसते, एखादा तेवणारा दिवा तिथे प्रकाश करतो.आज समाजाला सत्यवादी लोकांची गरज आहे, स्वार्थी नाही.स्वत:चे नुकसान झाले तरी चालेल, परंतु सत्याची बाजू धरणारा साक्रेटिस आज हवा आहे.. हवा आहे...!