- ना.रा.खराद
मानवी जीवन मोठे गंमतीशीर आहे,त्याचे जीवन म्हणजे फक्त सुचनांचे पालन आहे, जिथे जावं तिथे या सूचना पाठलाग करतात.सूचना कुठे कायदे रुपात,कधी धमकी तर कधी विनंती असतात.नोकरी करणारा चाकरमानी तर नुसत्या सूचनांचे पालन करत आयुष्य काढत असतो.सार्वजनिक जीवनात सुचनांचा पाऊस असतो.
कुठे कुठे तर घरगुती जीवनात देखील सूचनांचे फलक दिसतात. गेटवरच “ 🐕 कुत्र्यापासून सावधान." अशी माणसे घाबरविण्यासाठी कुत्रा सोडतात आणि पुन्हा,
“ घाबरु नका चावत नाही." इतका राग येतो की चावा घ्यावा वाटतो.
“ येथे लघवी करु नये." ही सूचना तर नसता प्रेशर वाढवते.मुकाट्याने चाललो असताना, नको तिथे बोट ठेवते.बरे इथे करु नये,मग कुठे करावी हेही सांगितले पाहिजे.उगीच नकारात्मक सुचनांचा धुमाकूळ घालू नये.
“ येथे थूंकू नका." या सूचनेचे तर कुणीच पालन करत नाही.अगोदरच कित्येकांनी थुंकलेले असल्याने सुचना तकलादू आहे, हे लक्षात येते.
“ येते गाडी पार्क करु नका,हवा सोडून देण्यात येईल." ही सुचना हवेतच राहते.तिथे पार्क करायला जागा शिल्लक नसते, म्हणून त्या सूचनेचे पालन होते. मंदिराबाहेर,“ चप्पल येथे सोडा." , नळावर गेले की,“ पाणी जपून वापरा."
काही सुचना उपदेशवजा असतात, यामध्ये सरकारी सुचनांचा समावेश करता येईल.
जसे “ पाणी गाळा ,नारु टाळा" " 🌲 झाडे लावा, झाडे जगवा." इ.
सूचनेतील विनंती देखील सुचनाच असते, फक्त विनंती शब्द वापरुन रोष कमी केला जातो, किंवा ओढून घेतला जात नाही.लग्नसोहळा किंवा राजकीय सभेत तर सूचनांचा भडीमार असतो. “ कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नये." कित्येक लोक सूचना नसताना जेवणाची पंगत मांडतात,तर कित्येक सूचना ऐकायलाशुद्धा थांबत नाही.
शाळा , महाविद्यालयात तर सूचनांचे फलकच असतात.तोंडी सुचनाही कमी नसतात.बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात अनेक सुचना झळकतात.
कुठे " ही जागा खाजगी आहे, वाहने पार्क करु नका." तर कुठे,” ही जागा सरकारी आहे, इथे वाहने पार्क करु नका." अशी सुचना व जोडीला कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी धमकी देखील!
बसस्थानकावर,“ आपले म्हणणे थोडक्यात सांगा." अशी सूचना वाचण्यात येते.माझ्यासारख्या वाचाळाला असली सूचना खुप खोचक वाटते.
खानावळीत गेलो तेव्हा,“ येथे नोकरांना रोज पगार दिला जातो." अशी सूचना वाचून चीड आली. आपला या सुचनेशी काही संबंध आहे का? पगार देतो हे सांगणे गरजेचे आहे का, प्रत्येक गिऱ्हाईक नोकरी मागणारे आहे का? फारच उदार असल्याचे किंवा चोख असल्याचे या सुचनेतून सुचवायचे असते. किंवा," येथे दारु पिण्यास सक्त मनाई आहे." इथे सक्त हा शब्द शासकीय असल्याने त्याचा अर्थ ' अशक्त' असा घ्यायचा असतो.शासनाच्या सूचनेवरुन या सुचना लिहिलेल्या असतात.
“ खिसेकापू पासून सावध रहा." इथे खिसा आणि खिसेकापू दोन्हीवर लक्ष ठेवावे लागते, त्यामुळे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होते.
“ इथे कचरा टाकू नका." कचऱ्याची टोपली पालथी करुन सुचना वाचायची असते.दारुची दुकान देखील अपवाद नाही.“ दारुचे पैसे अगोदर देणे." या सुचनेतून अविश्वास दिसून येतो, त्यामुळे मद्यपी थोडा वरमतो.
" कचरा कुंडीत टाका." अशीही सूचना द्यावी लागते.कुंडी असताना कचरा इथे तिथे टाकण्याची मानसिकता या सुचनेचे गर्भित असते.
एकूणच काय तर कोणत्याही सुचनेचे पालन होत नाही, म्हणूनच त्या दिल्या जातात.यामध्ये अनेक गंमती जमती असतात.सुचनांचे पालन करणे जरी शक्य नसले किमान त्यामधील आनंद तरी घेऊ या.
शेवटची सूचना!