कुणी पुरस्कार देता का....! टि.व्ही.लावला किंवा फेसबुक , whatsapp ओपन केले की ?

कुणी पुरस्कार देता का हो...!
                                            - ना.रा.खराद



रोज वर्तमानपत्र उघडले,टि.व्ही.लावला किंवा फेसबुक , whatsapp ओपन केले की अमूकला अमूक पुरस्कार,तमूकला तमूक पुरस्कार.अगदी आतंरराष्ट्रीय पासून तर घरातल्या घरात मिळणारे पुरस्कार बघून आपणासही एखादा तुच्छ पुरस्कार का मिळू नये असे वाटू लागले आहे.म्हणाल तर ईर्ष्या वाटू लागली आहे.
भारतरत्न वगैरेंची आपण अपेक्षा करत नाही. ते तर मोठे लोक एकमेकांना देतात घेतात.अंगी कोणते तरी मोठेपण किंवा कलागुण असल्याखेरीज किमान समाजसेवक वगैरे म्हणून एवढे तेवढे नाव असावे लागते.तसा मी एवढे तेवढे लिखाण करत असल्याने , एवढे तेवढे वाचक मला लेखक वगैरे म्हणू लागले आहेत.साहित्य क्षेत्रात तर पुरस्काराने कहर केलेला आहे.शब्दप्रभुंना दूसरे हवे तरी काय,त्याचे नावे एक-दोन पुरस्कार असले की बिरुद लावता येते.अमूक पुरस्कार प्राप्त म्हंटले की लेखक सुखावून जातो.त्यामुळे साहित्य क्षेत्रातील एखादा पुरस्कार मला मिळेल या आशेवर डोळे लावून बसलो आहे.किमान गल्लीतल्या ' बाल साहित्य 'मंडळाने सुरु केलेला 'चिऊजी अप्पा स्मृती पुरस्कार' तरी मला मिळेल याची मी आशा बाळगतो.
माझे अनेक साहित्यिक मित्र आणि क्वचित शत्रू
देखील अनेक पुरस्कार पटकावलेले आहेत.त्यांच्या
शोकेसमध्ये मांडलेले ते स्मृती चिन्ह मला त्याचा विसर पडू देत नाहीत.
मी व्यवसायाने शिक्षक असल्या कारणाने किमान
इथे तरी आपली दाळ शिजेल असे वाटले होते.
' शिक्षक भूषण' वगैरे असला एखादा पुरस्कार गळ्यात पडेल अशी खात्री होती.आदर्श शिक्षक असले पुरस्कार मला तर नकोच होते.आपण साने गुरुजी असल्यासारखे वाटू लागते.इथेही माझी निराशाच झाली..
आपण आदर्श असल्याची फाईल आपणच तयार करायची , पुन्हा आदर्शपणा जपण्यात उभे आयुष्य आडवे करायचे, हे नाही जमणार बुआ आपणास.
लोकांनी आपल्या समोर पान खाऊन थूंकायचे आणि आपण आदर्श शिक्षक असल्याने ते शिंतोंडे अंगावर घ्यायचे,कुणी शिकवले हे!
बालवयात निबंध लेखन स्पर्धेत भाग घ्यायचो परंतु
शिक्षकांच्या जवळच्या मुलांमध्येच ते पुरस्कार
संपून जायचे.तेव्हापासून आजतागायत सर्व क्षेत्रात
चाचपणी केली , प्रयत्न केले परंतु आपण कोणत्याच पुरस्काराच्या लायकीचे नाहीत याची खात्री पटली.
लोकसंख्येच्या प्रमाणात पुरस्कार वाढले.घेणाऱ्यापेक्षा देणारे वाढले.जिकडे तिकडे पुरस्कारप्राप्त लोक झाले.अमूक भूषण', तमूक भूषणचे युग आले.आपण कोणतेच भूषण नाहीत,याची खंत वाटू लागली.कोणताच
पुरस्कार नसल्याने लोक तिरस्काराने बघतात.बालवयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत पुरस्कार मिळाला होता.ते प्रमाणपत्र अत्यंत गचाळ अक्षरात लिहिलेले होते.तोच पहिला पुरस्कार ,शेवटचा ठरला.
पुरस्कार वितरण सोहळे रंगू लागले.अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.मला दीड दमडीचा
तरी पुरस्कार कधी मिळेल का हो?
माझ्या सारख्या तुच्छ माणसाला , एखादा तुच्छ
पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल का कधी?
मी पुरस्कारासाठी अनेक प्रयत्न केले.स्वत:च्या
नावाचा गवगवा केला.फाईल तयार केल्या‌.देणारांची स्तुती सुमने गायली,नाती गोती सांगितली, जातीपाती सांगितली तरीही नाहीच मिळाला पुरस्कार.
शासकीय, अशासकीय चालेल.कुणाच्या प्रित्यर्थ चालेल.गाजावाजा करण्यापुरता, मोठेपणा मिरवण्यासाठी एखादा पुरस्कार हवाच मला.कुणी देता का हो..!
आपल्याकडे असेल तर मला द्या हो एखादा पुरस्कार.आपली ओळख असेल तर सांगा हो द्यायला.फक्तस्मृतीचिन्ह तर द्या,शाल श्रीफळ
घेईल मी. कुणीतरी पुरस्कार देता का हो.......!


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.