एकाच वेळी..
- ना.रा.खराद
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.ज्या क्षणाला जगात माणसे मरतात,आक्रोश सुरू असतो इतर ठिकाणी त्याच क्षणी अनेक ठिकाणी बाळ जन्माला आलेले असते आणि त्याच्या खुशीत बाजा वाजत असतो,मिठाई वाटली जात असते.
जगात एककीडे महापुराने थैमान घातलेले असते तर दूसरीकडे स्वच्छ अशा तलावात तरुण तरुणी पोहण्याचा आनंद घेत असतात.
एकीकडे विवाहित रडत बसले असतांना दूसरीकडे वाजत गाजत नवीन विवाह संपन्न होत असतात. एकीकडे माणसाच्या कत्तली होत असतांना दूसरीकडे माणसांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न दिसतात.
एकीकडे भूकंपाने इमारती धराशयी होत असतांना, दूसरीकडे त्यांचे जोमाने निर्माणहोतांना दिसते.
एकीकडे अरबपती लाचार होऊन मरताहेत.तर इतरत्र माणसे आपली तिजोरी भरतांना दिसत आहेत .एकीकडे जगाला हादरविणारे दादा जीवनाची भीक मागत आहेत तर दूसरीकडे गल्लीबोळातले दादा छाती काढत आहेत.
एकीकडे खाऊन उरलेले कचऱ्यात फेकले जाते आहे, दूसरीकडे कचऱ्यातून शोधून अन्न खाल्ल्या जात आहे. एकीकडे मालकीच्या इतक्या इमारती की कुठे झोपावे कळत नाही, दूसरीकडे झोपण्यासाठी एक कोपरा कुठे मिळेल का याची विवंचना आहे.
एकीकडे सगळे धर्म मानवतावादी ,अहिंसक असतांना, दूसरीकडे धर्माच्या नावाखाली एकमेकांना कापले जात आहे.एकाचवेळी एकीकडे आग लागलेली असते तर दूसरीकडे बर्फाचा वर्षाव सुरू असतात.
एकीकडे पाण्यात माणसे मरतात ,दूसरीकडे पाण्यावाचून. एकीकडे वजन वाढविण्याचे प्रयत्न सुरू असतात ,दूसरीकडे ते कमी करण्याचे.एकीकडे अनेकांना बायको चांगलीमिळाली नाही याची तक्रार असते तर दूसरीकडे नवरा चांगला नसल्याचे गाऱ्हाणे असते.एकीकडे मुलांवाचून शाळा बंद होत आहेत, दूसरीकडे मुलांमुळे प्रवेश बंद होत आहेत. लोकशाहीमुळे अनेक भिकारी राजा बनले आहेत तर अनेक राजे भिक मागत आहेत. कुठे संपत्ती आहे पण संतती नाही, कुठे संततीस खायला नाही.एकीकडे झाडे लावली जात असतांना,जंगले नष्ट होत आहे विरोधाभास या जगाचे वास्तव आहे.