- ना.रा.खराद
समाजात बोलघेवडे लोकांचा एक वर्ग आहे, आपल्या वाणीतून ते सतत काहीतरी बरळत असतात, मनातील घाण ते तोंडावाटे बाहेर काढत असतात आणि सामाजिक वातावरण दूषित करत असतात.राजकिय पक्ष प्रवक्ते, धार्मिक ठेकेदार, जातीचे कैवारी आणि स्वयंघोषित तत्वज्ञानी सोशल मीडियावर गरळ ओकत असतात.धमक्या देणे, चिथावणी देणे , बुद्धीभेद करणे असले बाष्पळ उद्योग त्यांचे सुरू असतात.लोकांची करमणूक होते.तोंडसुख घेणारी मंडळी म्हणजे समाजाला लागलेली वाळवीच आहे.शब्दसंयम नसलेली माणसे जिथे तिथे असतातच.आपल्या बेछूट विधानाने वातावरण दूषित करत असतात.
बोलघेवडेपणा हा मानसिक रोग आहे.कारण नसताना काहीही बोलायचे आणि सगळं बिघडवून टाकायचे हा या लोकांचा छंद असतो.जातीय तेढ वाढवण्याचा कुटील डाव त्यामागे असतो.
क्षुल्लक गोष्टींचे भांडवल करून रान पेटवले
जाते आणि राजकीय फायदा करुन घेतला जातो.राजकिय संरक्षण किंवा जातीचा पाठिंबा मिळाला की या लोकांना जोर चढतो , पुढारी बनण्यासाठी चाललेली धडपड असते.
प्रख्यात लोकांचे वक्तव्य आणि त्यावर उमठणाऱ्या प्रतिक्रिया हा आता दैनिक परिपाठ झाला आहे.द्वेष भावना प्रबळ होत चालली आहे,प्रेमाची भाषा कुणीही बोलत नाही,तर मग प्रेम वाढेल कसे?
विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला हा बोलघेवडे लोकांचा नंगानाच कधी थांबणार?
बोलघेवडे लोक अज्ञानी, अविचारी असतात किंवा कारस्थानी , मुत्सद्दी तरी असतात.
सापांचे जसे तोंड ठेचल्या जाते,तसे या लोकांचे तोंड बंद करणे गरजेचे आहे,नसता्सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे पातक हे लोक करत राहणार.लोकांनी देखील अशा लोकांपासून सावध असले पाहिजे, त्यांच्या भडकाऊ विधानाचा शांतपणे विचार केला पाहिजे, भावनेच्या आहारी जाऊन कित्येकदा आयुष्याचे मातेरे होते.
बोलघेवडे लोकांचे समर्थन तर मूळीच करु नका,त्यांची उपेक्षा करा म्हणजे ते आपोआप गप्प बसतील.तोंडाळ लोकांचे तोंड बघू नका.