- ना.रा.खराद
समाजात खुप लोक लबाडी करतात,इतरांची फसवणूक करतात.काहींची लबाडी उघडी पडते तर काही ती लपवण्यात यशस्वी होतात.लबाड लोक फार ढोंगी असतात,ढोंगीपणामुळे त्यांना ओळखणे सोपे नसते.
लबाडी करणारी माणसे सर्व क्षेत्रात असतात,लबाडीच्या बळावर घबाड मिळवलेले असतात.
उद्योग, व्यापार, व्यवसायामध्ये तर लबाडी कौशल्य समजले जाते.नोकरी तर लबाडीनेच टिकून असते.राजकारण तर त्याशिवाय होतच नाही.फसवणूक करणे म्हणजे लबाडी, खालपासून वरपर्यंत बिनदिक्कत
चालणारी गोष्ट असते लबाडी.सर्वच करत असल्याने ती सर्वमान्य असते.
चोरी ही लबाडीची सख्खी बहिण असते.चोरी लबाडीने व लबाडी चोरीने साधली जाते.लबाडाचे घबाड दिसून येते.
खोटेपणा लबाडीसाठी आवश्यक कौशल्य आहे, जितके चांगले खोटे बोलता येईल तितकी लबाडी साफल्य होते.
लबाडाच्या मागे खुप समर्थक असतात,अनुयायाशिवाय लबाडी फळाला येत नाही.
लबाड पाताळयंत्री असतात, आपले मनसुबे जगाला कळू देत नाहीत.साधे,सरळ,सज्जन लोक त्यांचे शिकार असतात.
लबाड आश्वासने देण्यात पटाईत असतात, इतरांना झुलवत ठेवणे त्यांना चांगले जमते.तत्वहीन असल्याने
कोणत्या वेळी काय करतील ह्याचा नेम नसतो.जिथे लबाडाची दृष्टी पडते तिथे काहीतरी विपरीत घडतेच.
लबाडाचा मेंदू राक्षसाचा असतो,तो सतत नवनवीन शक्कल लढवत असतो.
लबाड हा स्वार्थी असतो, आपल्या फायद्यासाठी इतरांचा वापर करतो.तो धोकेबाज असतो, कोणत्या वेळी धोका देईल सांगता येत नाही.लबाडाचे दूकान लहान आणि मकान मोठे असते.लबाडांना मध्यस्थी फार आवडते.दलालीचा धंदा ते उत्तम करतात.दोन्हींचा पैसा खाता येते हे लबाडीशिवाय शक्य नसते.
लबाडाची वाणी मधुर असते.त्याचे ऐकावेसे वाटते कारण त्याने लोकांना ओळखलेले असते.विश्वास संपादन केल्याशिवाय लबाडी करता येत नाही.दलाली लबाडीचे यश आहे.
लबाडाच्या तावडीत सापडणे धोक्याचे असते,लबाडावरचा विश्वास मूर्खपणा ठरतो.
लबाडी आपण तर करुच नये आणि इतरांच्या लबाडीपासून सावध असावे.