मनुष्य जन्माबरोबर सोबत घेऊन येतो ,तो म्हणजे स्वभाव होय.मृत्युपर्यंत जो आपली साथ सोडत नाही तो स्वभाव.माणसाचे बाह्य रुप पालटता येते परंतु कुणाचाही स्वभाव कधीच कुणीही बदलू शकत नाही.लाखों शाळा, महाविद्यालये हा खटाटोप करतात परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही.
श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली, दुर्योधनाला नाही.काहीही झाले तरी कौरव
हेका सोडत नव्हते.वास्तव समजून घेतले तर कुणालाही समजते परंतु स्वभाव नडतो.रावणाला काय कमी समजावले , परंतु स्वभाव तो स्वभाव.रक्तातले गुणधर्म जात नाही.एखाद्यास ,",तु असे का वागतोस?" असा प्रश्न करून उपयोग नसतो.त्याने काहीही उत्तर दिले तरी त्याचे खरे कारण त्यांचा स्वभाव असतो.माणसाला सर्वांत नडणारी गोष्ट स्वभाव आहे.वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांत आपण वावरतो,आपणही त्यास अपवाद नसतो.आपला स्वभाव आपणास कळत नसतो.इतर कुणीतरी आपणास तसे सांगते.आपण त्यावर विश्वास ठेवतोच असे
नाही.ज्ञानी माणसे आत्मचिंतन करतात.स्वभाव ओळखतात.स्वत:चा ओळखल्याविना इतरांचा ओळखण्याचा दावा
फोल ठरतो.सारख्या स्वभावाची माणसे एकमेकांशी लवकर जवळीक साधतात.स्वभाव जुळला की इतर सर्व आपसूकच जुळते.
स्वभावालाच वृत्ती म्हंटले जाते.वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये हा स्वभावाचा भाग असते.
ओळखीचे लोक आपला स्वभाव ओळखूनअसतात.इतरांना सतत नाव ठेवणे ,हा कित्येकांचा स्वभाव असतो.दिसेल त्यास नाव ठेवणे ,उणीवा किंवा चुक शोधणे त्यांचे गुणविशेष असतात.याउलट कशालाही चांगले म्हणणे काहींचा स्वभाव असतो.सतत बोलणारे तसे कायम गप्प बसणारेही असतात.बढाईखोर, दयाळू,अंहकारी,कपटी,
चहाडीखोर,भित्रे,लालची,स्वार्थी,कंजुष,उधळे अशा स्वभावाची माणसे असतात.उतावीळ, टवाळखोर, कारस्थानीही असतात.
आपण स्वतःचा स्वभाव बदलू शकत नाही,मग इतरांचा बदलण्याचा खटाटोप का? आणि जरी तो कोणत्या तरी
कारणाने बदलला तरी मुळ स्वभावावर तो आल्याशिवाय राहत नाही, म्हणून कुठल्याही माणसाचा स्वभाव माहीत असणे आणि त्यानुसार त्याच्याशी वागणं, शहाणपणाचे असते.
खादाड, झोपाळू असतात.खोटारडे,न्यायी असतात.चिडचिडे,मट्ठ स्वभावाचे असतात.आपण आपल्या स्वभावानुसार वर्तन करतो आणि समोरचा त्याच्या स्वभावानुसार,इथेच गडबड होते.मला असे चालत नाही,पटत नाही वगैरे.
मनमोकळ्या स्वभावाचे,प्रेमळही असतात.विनोदी किंवा गंभीर स्वभावाची असतात.
प्रवचन,किर्तणानेही माणसांचा स्वभाव बदलत नाही फक्त स्वभाव उघड होतो. स्वभाव भिन्नतेमुळे बेबनाव होतो.स्वभावनुसार माणसांचे गट पडतात.
स्वभावातले वेगळेपण आवश्यक देखील आहे.कोणता स्वभाव चांगला वाईट हे ठरवणे ही सोपे नाही.काळवेळ ते ठरवते.स्वभाव बदलण्याच्या फंदात न पडता,तो समजून घेण्याचा प्रयत्न करावयास हवा.अर्थात हे
प्रत्येकालाच जमते असे नाही.परंतु जगण्याचा अधिक आनंद मिळवायचा असेल तर हे जमावयास हवे.