- ना.रा.खराद
माणसांची गर्दी आपण बघतो परंतु कधी गर्दीतला माणूस बघितला का? नसेल बघितला
कारण तेवढे गर्दीमध्ये आपण भानावर रहात नाहीत,गर्दीतले होऊन जातो,गर्दीसारखे होतो.
मनुष्य एकटा असला तर तो खरा मनुष्य असतो, चारचौघांत घुसला की तो अंशतः मनुष्य उरतो आणि गर्दीत घुसला की तो मनुष्य उरत नाही.गर्दी त्यास तसे राहू देत नाही.गर्दीची गरज किती असते,गर्दीची खरेच गरज आहे का?
गर्दीची ठिकाणे कोणती ? याविषयी विचार करणे गरजेचे आहे.हल्ली अनेक कारणांमुळे गर्दी होते, गर्दी जमते देखील आणि जमवलीही जाते.एकत्र येण्याचे काही फायदे आहेत का की
फायद्यासाठी लोक एकत्र येतात?
सार्वजनिक ठिकाणी गर्दी असते.बसमध्ये जागा पकडण्यासाठी सभ्य गृहस्थ देखील असभ्य वर्तन करतो.गर्दीत कुणी सभ्य राहू शकत नाहीत.जगभर मोकळी जागा असतांना माणसे एकत्र येऊन लोटालोटी, धक्का बुक्की का करत असावेत.आता तर प्रत्येक ठिकाणी गर्दी असते.गर्दीची सवय झाली आहे.
एकटे असणे फारच कंटाळवाणे होते.वेगवेगळे उत्सव,मिरवणूका,आंदोलने इथे तर गर्दी होतेच.
सिनेमा,तमाशे, प्रवचन ,सभा याठिकाणी गर्दी बघायला मिळते,यात्रा, जत्रा वेगळ्या.शाळा, महाविद्यालय इथेही गर्दी होते.अफवा पसरली की चेंगराचेंगरी ठरलेली.आरडाओरड ,धावपळ गर्दीची मानसिकता.काहींना गर्दी आवडते.एक वेगळाच कैफ चढतो.गर्दीत देखील एकटे असल्यासारखे स्वतः ला अलिप्त ठेवतात.तिथे कुणीही अस्पर्श नसते.शरीर घासले तरी मन नामनिराळे ठेवावे लागते.
गर्दी पांगवण्यासाठी पोलिस लाठीमार वगैरे करतात,तर जमविण्यासाठी राजकारणी वेगवेगळे क्लृप्त्या वापरतात.गर्दीकडे ताकत असते, गर्दीला समजावणे मोठे कठीण असते, अशावेळी गर्दीला समजून घेणे महत्त्वाचे असते.
लोकशाहीमध्ये गर्दीला महत्त्व आहे.नुसतीच भाऊगर्दी उपयोगाची नसते.गर्दीकडे ताकत असते, विवेक नसतो.गर्दीला दिशा नसेल तर ती दिशाहीन होते आणि नको ते घडते.गर्दीमध्ये उत्साह,आवेश असतो.ती कोणते वळण घेईल सांगता येत नाही.माणसे एका उद्देशाने एकत्र येतात, किंवा एकसारखे असतात म्हणून एकत्र येतात.कधी एकत्र डांबले जाते.
बघ्यांची गर्दी हा एक वेगळा प्रकार आहे.उद्देश एक असला तरी ही गर्दी एक नसते.एका उद्देशाने जमण्याची काही ठिकाणे असतात.तर जमले की अनेक उद्देश साध्य करणारेही असतात.काहींना गर्दी सोसत नाही.पर्याय नसेल
तर सोस सोसावाच लागतो.गर्दी ऐकण्याच्या स्थितीत नसते.ऐकण्यासाठीच झालेली गर्दी मात्र
मौन बाळगते.गर्दीचा एक वेगळाच सुर तयार होतो.गर्दीत घुसते किंवा बाहेर पडणे दोन्हीसाठी
कसरत करावी लागते.गर्दीमध्ये माणसांची ओळख राहत नाही.तुम्ही फक्त माणूस असता.
गर्दीत जसे सुरक्षित वाटते तसे भिती देखील.गर्दीवर नियंत्रण ठेवणे मोठे कठीण कार्य असते.
गर्दी हा लोकशाहीचा आत्मा आहे.अनेक फंडे वापरुन गर्दी जमवली जाते.मृत्युनंतर देखीलगर्दी आपला पिच्छा सोडत नाही.
आपण कधी गर्दीच्या मागे ,कधी पुढे तर कधी गर्दीच्या सोबत असतो.