- ना.रा.खराद
आपल्यापैकी प्रत्येकजण इतरांबद्दल बोलत असतो, इतरांमध्ये गुण दोष शोधत असतो,त्याची चर्चा करत असतो, निंदा करत असतो, स्तुती करत असतो, परंतु आपण स्वतःला कधीच तपासून बघत नाहीत, आपण कसे आहोत, हे आपणास माहीत नसते, इतरांना आपण विचारतो किंवा इतर त्याबद्दल बोलतात.
इतरांना नावे ठेवत असताना, आपण किती चांगले आहोत ,हा विचार करत नाही.ज्यांच्याकडे सत्ता,संप्पती किंवा प्रतिष्ठा आहे,केवळ अशा लोकांच्या गुण दोषांची चर्चा होते, मात्र सर्वसामान्य माणसे देखील गुणी किंवा दोषी असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
नोकरदार, छोटे व्यावसायिक व अन्य कोणत्याही क्षेत्रातील माणसे हेकेखोर,हावरट, हिंसक,अंहकारी, स्वार्थी,लंपट, चुगलखोर, कंजूस, धोकेबाज, खोटारडे,आळसी ,अकुशल असू शकतात.मात्र कुणीही आपल्या ठिकाणी इत्यादी दुर्गुण आहेत का, हे कधीच तपासून बघत नाही, आणि कुणी लक्षात आणून दिले तर, मान्य करत नाही, त्यामुळे ते कधीच नष्ट होत नाहीत.
दूधामध्ये पाणी घालून दूध विकणारा दूधवाला, माप मारणारा दुकानदार, घाणेरडे वेटर किंवा खानावळी कधी स्वतःला तपासून पहात नाही.जो तो इतरांचे दोष दाखवतो, परंतु आपल्या ठिकाणी असलेले दोष त्यास दिसत नाहीत.इतरांचे दोष दाखवून,आपण गुणी ठरत नाही,तर आपले दोष ओळखून ते दूर केल्यावर गुणी ठरतो.
आपले खुप चुकतेय, असे आपणास वाटले पाहिजे,त्या चूकांची एक यादी तयार करुन, त्या चूका दुरुस्त केल्या पाहिजेत, तेव्हा आपली प्रगती होते, अधोगती थांबते.
फक्त शरीराबद्दल नाही तर मन आणि बुद्धी तपासून बघितली पाहिजे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोकांचा आदर केला पाहिजे,त्याचा आदर्श घेतला पाहिजे.लोक असे आहेत, तसे आहेत यापेक्षा,मी कसा आहे,हा प्रश्न स्वतःला केला पाहिजे, माझ्या ठिकाणी कोणत्या उणीवा आहेत आणि त्या मी कशा दूर करु शकतो आणि त्या उणीवांचा कोणता
दुष्परिणाम माझ्यावर होत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
आपण कोणत्याही व्यवसायात असू ,तो व्यवसाय आपण किती प्रामाणिक आणि सचोटीने करतो, हे कधीतरी तपासले पाहिजे.आपल्या भाव भावना कशा असतात, याविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.आपल्या ठिकाणी राग,लोभ वगैरे आहे का,त्याची स्थिती काय आहे, हे तपासणे गरजेचे असते.स्वत:शी संवाद वाढवला पाहिजे.
आपणच आपले मित्र किंवा शत्रू असतो,इतरांवर खापर फोडण्यात काही अर्थ नसतो.लोकांनी आपणास ओळखावे ही अपेक्षा बाळगू नका, अगोदर स्वतःला ओळखा.