- ना.रा.खराद
आज चहामध्ये पत्ती जास्त होती त्यामुळे चहा पिऊ वाटत नव्हता,कसाबसा पिलो पण नंतर खुप डोके दुखायला लागले,भोवळ यायला लागली.तशाही अवस्थेत डोक्यात विचार आला की चहासाठी पत्ती तर हवीच परंतु प्रमाण न राखल्याने त्याने चव सोडली होती.काल देखील
पत्ती कमी पडल्याने चहाची चव बिघडली होती.
यावरून लक्षात आले की प्रमाण राखल्याशिवाय चव साधत नाही.प्रमाणाबाहेर गेले की चव बिघडली म्हणून समजा.
प्रमाण केवळ खाण्याच्या पदार्थापुरते मर्यादित न राहता त्याची गरज सर्वच ठिकाणी आहे.प्रमाण सोडलेली माणसे अप्रमाणित समजली जातात.आत्मभान असल्याखेरीज प्रमाण राखता येत नाही.इतरांनी लक्षात आणून देण्याची वेळ येणे हे केविलवाणे आहे.आपले हसे होते हे तरी लक्षात यावयास हवे.लोक आपले दोष तोंडावर बोलत नाहीत,माघारी बोलतात.माणसे गमवायची नसल्याने कुणीही आपले दोष सांगत नाही, त्यामुळेच ते वाढीस लागतात.अशावेळी निंदकाची फार गरज असते.
सत्ता आणि श्रीमंती असेल तर त्यांच्यापुढे सगळे
'होयबा' असतात यामुळे अपरिमित नुकसान होते,कुचेष्टा होते,दोष कायम राहतात.
बहुतेक माणसे कोणत्यातरी अतिकडे झूकलेली
असतात.अति बडबड,अति मौन.अति साहस ,अति भित्रा.अति उदार,अति कंजूस.
अति मूर्ख,अति शहाणा.अति थाटअति गबाळा.
अति घाई,अतिसंथपणा खुप दिसतो.त्याचे परिणाम ठरलेले असतात.
जेवतांना अति आग्रह किंवा मूळीच नसणे दोन्हींचा परिणाम ठरलेला असतो.
अति खरे किंवा अति खोटे बोलणे दोन्हीही मारक असते.त्याचा मध्यबिंदू म्हणजे प्रमाण राखणे.
बढाईखोर माणसे प्रमाणाबाहेर फेक्या मारतात
त्यामुळे त्यांचे हसू होते.ज्यांचे तोंड कधीच उचकटत नाही अशी माणसे देखील हास्यास्पद
असतात.काहीही झाले तरी गप्प.गप्प राहण्याचे
प्रमाण , अप्रमाण असते.टोकाचे वर्तन हे प्रमाणशीर नसतेच.अति रागीट इतकेच अतिशांत असणे प्रमाणशीर नाही.
अति झोपणे किंवा अति जागणे प्रमाणाबाहेर जाते, दुष्परिणाम तर भोगावेच लागतात.चांगले किंवा वाईट तरी काय असते? जे प्रमाणात असते ते वाईट देखील चांगले ठरते.
प्रमाणाबाहेरचे चांगले देखील वाईट ठरते.
प्रमाण हाच खरा निकष आहे, तो पाळला पाहिजे.
काही माणसे चिकटून असलेल्या माणसाला
बोलतांना देखील कानठळ्या बसतील इतक्या
जोराने बोलतात ,कुणी मोठ्या सभेत देखील हळू बोलते मागच्यांना ऐकू देखील जात नाही.मोबाईलवर जोरजोराने बोलतात.
चालतांना देखील प्रमाण राखले जात नाही.खुपच झपझप चालणे किंवा अगदीच संथ गति हे टोकाचे झाले.प्रमाण इथेही हवेच.
एखाद्या सभेत बोलणारा वक्ता उपस्थित समूदाय, उपलब्ध वेळ, प्रसंग लक्षात न घेता बोलत असेल तर त्याचे भाषण नकोसे होते.
इतरांचा वेळ एकट्याने खाऊन टाकणे , इतरांच्या वाट्याचे पदार्थ एकट्यानेच फस्त करण्यासारखे ओंगळवाणे आहे.
कोणत्याही अतिपासून सावध व्हावे.आपण अतितर करत नाही ना याचा वेध घ्यावा.आत्मपरिक्षण करावे आणि प्रमाण राखावे .एक विवेकी मनुष्य म्हणून आपणास ओळखले जावे.