- ना.रा.खराद
मी एका विवाह समारंभात होतो,वधू पक्षाकडून
सत्कार सोहळा सुरू झाला.नवरा नवरी ताटकळत उभे आणि इकडे सत्कार जोमात.
मोठी, प्रतिष्ठीत , श्रीमंत माणसे शोधून त्यांचे सत्कार करण्यात येत होते.बिचारे माझ्या सारखी सामान्य माणसे ताटकळत बसली होती.
सत्काराचे सोहळे होत आहेत, कित्येक किलोचा हार तयार केले जातात.हा फूलांचा अपव्यय आहे.गळ्याचा हा दुरुपयोग आहे.केसाने गळा कापणे आता बंद झाले,आता हाराने ते कापले जातात.रांगेत हार घेऊन जेव्हा माणसे उभा बघतो, तेव्हा वेळ आणि फूले यांचा नाश मला उघड्या डोळ्यांनी दिसतो.
हल्ली जिकडे-तिकडे असले सत्कार बोकाळले आहेत.कोण, कुणाचा, कुठे , कशासाठी सत्कार
करेल सांगता येत नाही.सत्काराच्या साहित्याचा
खप खुप वाढला आहे.हार घालणारे आणि तो
घालून घेणारे यांनी चोहीकडे धूमाकूळ घातला आहे.
कोणत्या तरी पदाचे शेपूट चिकटले की सत्काराला जोर चढतो.लग्नसमारंभ असो की डोहाळे जेवण , सत्कार होणारच! दहावीला पास झाला की सत्कार.बाहेरच्या देशातून आला सत्कार.चित्रकलेत पहिला आला , शाळेत हजर राहिला सत्कार! उपाशी राहतो, खुप खातो सत्कार.प्रवासावर चालला ,वापस आला सत्कार.
अधिकारी आणि नेत्यांचे इतके सत्कार का होतात,कारण त्यामागे स्वार्थ असतो.ओळख वाढवणं हा उद्देश असतो.सत्काराचे अक्षरशःस्तोम माजले आहे.त्याचे अतिअवडंबर किळसवाणे वाटू लागले आहे.प्रतिष्ठा आणि स्वार्थ याच्या पलीकडे त्याचे महत्त्व उरले नाही.
क्षणाच्या प्रतिष्ठेपायी पैशाचा अपव्यय होत आहे.हुजऱ्या लोकांचा तो धंदा झाला आहे.
हल्ली छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सत्कार केले जातात, त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले आहे.सत्काराचा खर्च कमी आणि फायदा जास्त म्हणून उठसूठ कुणीही कुणाचाही सत्कार करत आहे.
सत्काराचे उपसत्कार होत आहेत.मोठेपणा मिरवण्याचे ते एक साधन बनले आहे.सत्काराचे फक्त निमित्त हवे.निवडून आला की गावभर सत्कार.घरभरणी असो की पायाभरणी सत्कार ठरलेला!
कुस्तीचा फड असो की तमाशाचा सत्कार ठरलेला.
सत्कार करणारे फार हौसी असतात, प्रवासात
असलेल्या नेत्यांचेही रस्ता अडवून सत्कार करतात.आपला मान कुणाला नको असतो, परंतु तो खरेच मान असतो का?केवळ औपचारिकता असते ह्याचाही विचार केला पाहिजे.
अधिकाऱ्यांचे सत्कार तर फारच थाटाचे असतात,जिथे फायदा तिथे सत्कार.नवीन अधिकारी बदलून आला की
त्याचा सत्कार,कुणाची बदली झाली की सत्कार.कुठल्या तरी हुद्यावर असले की सत्कार ठरलेला, किमान महाराज वगैरे तरी असले पाहिजे किंवा एखादा पुरस्कार कधीतरी मिळालेला पाहिजे,सत्कारातून सूटका नाही.
नेते तर गर्दी म्हंटले की हजेरी लावतात.जिथे मान मिळतो,तिथे जाण्याची ओढ लागते.यजमान आपल्या मोठेपणासाठी बोलावतो.इतर नूसते बघ्यांच्या भूमिकेत दिसतात.
सत्काराचे वाढते प्रमाण,त्याचे महत्त्व कमी करत
आहे.सत्कार होऊ किंवा करु नये ,मी या मताचा
नाही किंवा मी त्याचा हेवा करतो असेही नाही, सत्काराचे साहित्य स्वस्त आहे म्हणून सत्कार
स्वस्त होऊ नये.तो कुणी ,कुणाचा ,का करायचा
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु त्यासाठी इतरांना वेठीस धरणे योग्य नाही.
शाल आणि श्रीफळ याचा खूप वाढला इतकेच.
हार उरले म्हणून कुणाच्याही गळ्यात टाकायचे किंवा कमी पडले म्हणून तेच वापरावयाचे इतके सत्काराचे अवमूल्यन नको.
सत्कारानंतर उपसत्कार होऊ नये ही माफक अपेक्षा.नको त्या कारणाने, नको त्याचे, नको तिथे सत्कार करण्यात येऊ नये.
सत्काराचे महात्म्य आणि पावित्र्य राखले जावे, उठसूट कुणाचाही सत्कार कुणीही करु नये.
योग्य व्यक्तीचा ,योग्य कारणासाठी,योग्य ठिकाणी,योग्य व्यक्तीच्या हस्ते तो व्हावा , जेणेकरून त्याचे महत्त्व अबाधित राहिल.