गोडबोले
- ना.रा.खराद
मनुष्य बोलणारा प्राणी आहे,तो बोलून आपले मत, भावना व्यक्त करतो, बोलण्यावरून माणसाची ओळख होते.बोलण्याची लकब जशी प्रत्येकाची वेगळी असते,तसा स्वर देखील वेगळा असतो.काहींचे बोलणे साधे सरळ अगदी जसे आहे तसे असते, परंतु शिक्षित लोक भाषेचा,स्वरांचा योग्य मेळ व वापर करतात.शुद्ध भाषा व मांडणी यामुळे त्यांचे वेगळेपण दिसून येते.कुणी कर्णकर्कश बोलते,कुणी अत्यंत विखारी बोलते तर सतत तिरकस बोलते.मधुर वाणी ऐकायला सर्वांना आवडते, परंतु बोलायला नाही.गोड बोलणे,हा काहींचा उपजतच स्वभाव असतो,तर तो काहींनी अंगीकारलेला असतो.गोड बोलले की फावते असा काहींचा समज असतो,तर गोड बोलले की कुणी शत्रू होत नाही असे कुणी समजतो.
कित्येक माणसे फक्त गोड बोलणारे असतात, परंतु गोड वागत नाही.गोड बोलून फसवणूक करायची असा खुप लोकांचा उद्योग सुरू असतो.सहमती दाखवणं, होकार देणे, यामुळे अशी माणसे लोकप्रिय होतात.गोड बोलणे चांगले आणि योग्य असले तरी ते फसवे असू नये.
स्वत:च्या स्वार्थासाठी गोड बोलणारी माणसे कमी नाहीत.धंदेवाईक लोक तर गोड बोलून फसवणूक करतात.गोड बोलून काटा काढणारे कमी नसतात.गोड बोलणाऱ्या माणसांवर डोळे बंद करुन विश्वास कधीच ठेवू नये.गोड बोरांमध्ये जसे कीडे असतात,तशी गोड बोलणारी अनेक माणसे धोकेबाज असू शकतात.
व्यवहारात फसवणूकीचे प्रकार या गोड बोलण्यातून घडतात.गोड बोलून कट रचले जातात.गोड बोलून जाळ्यात अडकवले जाते.मधुर वाणीचा प्रभाव खुप असतो.गोड बोलण्यामागचा भाव बघितला पाहिजे.सत्य
बोलणे कटू असते म्हणतात,ते मला चूकीचे वाटते,कारण ते ऐकण्याची आपली तयारी नसते, म्हणून तसे वाटते.याउलट गोड बोलणे प्रिय असले तरी ते जर असत्य असेल तर अयोग्यच.
गोड बोलणे चूकीचे नाही, परंतु चूकीचे काम करुन घेण्यासाठी गोड बोलणे केव्हाही चुकीचेच.इतरांचे मन दुखवू नये, हे खरे आहे, परंतु त्यासाठी खोटे बोलावे असे नाही, किंवा पोटात एक आणि ओठात एक असे होऊ नये.
मनात जो भाव आहे, तोच वाणीतून व्यक्त झाला तर तो एक प्रामाणिकपणा आहे, समोरच्या व्यक्तीला आपण फसवत नाहीत, हे महत्त्वाचे आहे.परंतू गोड बोलून त्या व्यक्तीला गाफील ठेवणे कपट आहे.आणि
कपटी माणसे बहुदा गोड बोलणारी असतात.