शिव्या
- ना.रा.खराद
इतरांना न मागता दिली जाणारी आणि लाभणारी गोष्ट म्हणजे शिवी! आपण आयुष्यात अन्नाइतक्याच शिव्या खातो.शिवी समोर देता आली नाही तरी माघारी देता येते,उघड देता आली नाही तरी मनातल्या मनात देता येते.शिव्या मानवी राग, द्वेष , ईर्षा व्यक्त करण्याचे अमोघ माध्यम आहे.शिव्यामुळे अनेक भांडणे टळलेली तर अनेक वाढलेली असतात.शिव्या शिकवाव्या लागत नाही, बालवयात त्यांचे संस्कार होतात, पुढे मित्रांना सतत शिव्या देण्या घेण्याने त्याचा विकास होतो, त्या दृढ होतात.
शिव्यांचाही एक संस्कार असतो,तो कुटुंब आणि समाजातून होत असतो.शिवीचा परिणाम किती करायचा
यावरून शिव्यांची निवड करावयाची असते,काही शिव्या
आपसूकच तोंडावाटे बाहेर पडतात.भावनेचा उद्रेक झाला की शिव्या नियंत्रित राहत नाहीत.शिव्या प्रेमाने देखील दिल्या जातात.प्रेम असेल तर बाधा होत नाही.
कोणत्याही भांडणाची प्रस्तावना शिव्यांनी होते, शिव्या वरुन रागाची तीव्रता लक्षात येते.शिवी आणि शिव्यांमध्ये फरक असतो.रागाने शिव्या दिल्या जातात,तशा त्या राग आणण्यासाठी दिल्या जातात.शिवी देणारा ती घ्यायला तयार असावा लागतो.शिव्यांचा परिणाम दिसून येत नसेल तर त्यांचा भडिमार केला जातो.कधीकधी आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी शिव्या झाडल्या जातात.
मालकाने नोकराला शिव्या दिल्याच पाहिजे,असा सर्व मालकांचा समज आहे,मालकीपणाचा तो एक दंडक आहे.
शिव्या कोणत्याही भाषेत उपलब्ध आहेत.शिव्यांचा शोध कुणी लावला, हे महत्त्वाचे नसते, फक्त त्यांचा वारेमाप वापर महत्त्वाचा! एखाद्याला' मूर्ख 'संबोधले की ती शिवी होऊन जाते.'साले' हे जरी नाते असले तरी ती शिवी समजली जाते.बरीच भांडणे शिव्यांनी सुरू होतात आणि शिव्यांवर थांबतात.वाकयुद्धामध्ये शिवी या शस्त्राचा वापर होतो.काही माणसांना सतत शिव्या देण्याची सवय असते, त्यांच्या शिव्या कुणी मनावर घेत नाही.लाचार माणसे शिव्या पचवून घेतात.
शिव्या नात्यावरून जास्त दिल्या जातात,जवळच्या नात्यावरचा हा हल्ला असतो.अपमान करण्यासाठी जवळच्या लोकांना टार्गेट करावे लागते.आई किंवा बहिण नात्यावरुन शिव्या दिल्या जातात.अनेक शिव्या अर्थहीन असतात, परंतु त्या शिव्या म्हणून प्रचलित झालेल्या असतात.शिवीवरुन त्या शिवीचा दर्जा निश्चित होतो.काहींच्या नकळत शिवी निघते.एकाच वेळी एक शिवी अनेकांना देता येते.शिवीसाठी अनेक प्राण्यांच्या नावाचा वापर होतो.कुणाला 'कुत्रा ' तर कुणाला ' डुक्कर ' संबोधले जाते.
जवळच्या मित्रांमध्ये शिव्या या ओव्या समजल्या जातात.शिवी कोणतीही असली तरी देणारा मित्र आहे बात खल्लास! शारिरिक व्यंग हे शिव्याचे माध्यम ठरते,या शिव्या मर्मावर बोट ठेवतात.शिवी जितकी अचूक तितका राग व्यक्त होतो.नैराश्यामध्ये शिव्या दिल्या जातात.अनेकवेळा स्वतःला शिवी दिली जाते.' मी झक मारली' असे बोलले जाते.' तुझ्या बापाला भीत नाही ' यामध्ये बापाचा अपमान आहे, म्हणून ती शिवी समजली जाते,शिवी देण्याचा खरा उद्देश अपमान करणे हाच असतो.शिवीचे प्रतिउत्तर शिवी नाही आले तर शिव्या बोथट होतात.
खुप लोकांना शिव्या देणे आवडतं नाही, किंवा जमत नाही.असे लोक रागामध्ये ' नालायक ' या सौम्य शिवीचा वापर करतात.संवेदनशील माणसांवर शिवीचा खुप परिणाम होतो.शिवी कोण देतो आणि कुणाला देतो यावरून त्यांचे मोल ठरते.मोघम दिलेल्या शिव्या अंगावर कुणी घेते ,कुणी नाही.
हिनवण्यासाठी,कमी लेखण्यासाठी शिव्यांचा वापर होतो.दूबळेपणातून देखील शिवी दिली जाते.खुप वेळा
यामुळे लोक मार खातात.अनेक संतांनी आपल्या ओव्या मध्ये शिव्या वापरलेल्या आहेत.शिव्या जशा वाईट
माणसे वाईट हेतूने देतात, तशा चांगली माणसे शुद्धा चांगल्या हेतूने शिव्या देतात.
शिव्यामध्ये अश्लील शब्दांचा वापर जास्त होतो.या शिव्यांचा परिणाम जास्त होतो.शिवी शाब्दिक असली तरी ती देण्याची पद्धत महत्त्वाची असते, हावभाव तीची क्षमता ठरवतात.मत्सर , कुत्सितपणे दिली जाणारी शिवी
खुप झोमणारी असते.फुकटे, हरामखोर वगैरे शिव्या खुप जहाल असतात.चारचौघात ऐकावी लागणारी शिवी
खुप तीव्रता वाढवते.
स्त्रियांच्या भांडणात शिव्यांचा सुकाळ असतो,वाचिक युद्ध हे देखील युद्ध असते.
शिव्या मानवाचा अमूल्य ठेवा आहे.शिव्यांचा वापर हा होत राहणार आहे.परंतू वापराचे तंत्र आपणास अवगत हवे.
कोणती आणि कुणाची शिवी मनावर घ्यायची याचे तारतम्य बाळगायला हवे.शिव्या खाणे कुणाला आवडत नाही,म्हणून त्या देवूच नये.अगदीच पर्याय नसेल तर त्या सौम्य असाव्यात, जेणेकरून पुढे त्या उग्र होणार नाहीत.