- ना.रा.खराद
मी शाळेत असताना मला शिक्षकांनी अनेकवेळा दगड असे संबोधले आहे,त्याची खंत त्यावेळीही नव्हती आणि आजही नाही,कारण शिक्षक काहीही म्हणाले तरी त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होत नसे, कदाचित परिणाम होत नाही म्हणून दगड उपमा दिली जात असेल!
आपले संपूर्ण जीवन दगडाने व्यापलेले आहे, जिथे तिथे दगड आपल्या उपयोगी पडतो,तो निर्जीव असला तरी सजीवांच्या उपयोगी पडतो.दगडाचा महिमा इतका अपार आहे की त्याच्यासमोर नतमस्तक व्हावे वाटते.
पूर्वी घरामध्ये जे जाते असायचे ते दगडाचे असायचे, वरवंटा पाटा ज्यावर मसाला तयार होत असे,दगडाची चूल मांडली जायची.चपलेचा खिळा बाहेर आला की तो दगडाने ठेचला जायचा.वजनमापे म्हणून दगडाचा वापर होतो, कुठे विंचू वगैरे निघाला की दगडाने चिरडला जातो.
रास्ता रोको आंदोलन असले की रस्त्यावर दगड टाकले जातात.चिखलफेक इतकाच दगडफेक हा प्रकार बघायला मिळतो.दगडांचा शस्त्र म्हणून वापर होतो.तो फेकायला सोपा असतो.त्याचा हवा तसा उपयोग करता येतो.
दगडाच्या कुळात अनेक प्रकारचे दगड असतात.जो तो आपल्या ठिकाणी महत्त्वाचा असतो.समुद्राच्या लाटा थोपवून धरण्याची क्षमता फक्त दगडांमध्ये आहे.त्याच्यावर परिणाम होत नसला तरी तो खूप परिणाम करत असतो.
दिले ते काम करणे दगडाचा स्वभाव असतो.स्थिर मनोवृत्तीचे असतात दगड, ठेवले तिथे त्यांची पडून राहण्याची तयारी असते.वेगवेगळ्या आकारात आणि प्रकारात कुठेही उपलब्ध असतात.मंदिरात
नारळ फोडण्यासाठी त्याचा उपयोग होतो.दगड कधी खाली तर कधी वर वापरला जातो.तो उपयोगी असला तरी ठोकर सहन करत नाही, वेदना देऊन जातो.पायरी होऊन तो खाली पडायला तयार असतो, तसा तो डोक्यावर पडून डोके ही फोडू शकतो.खडे,गोटे वगैरे त्याचेच अपत्य,जशी ज्याची गरज तशा आकारत उपलब्ध!
उतारावर गाडी घसरु नये म्हणून खंबीरपणे
आडवा झालेला दगड सामान्य नसतो.
गोफणीमध्ये भिरकावून पाखरांना हुसकावून लावण्यात तो पटाईत असतो.
सुंदर इमारतीच्या पायाभूत दगडांचा त्याग कळस असतो,अचलता त्याचा दोष नसून गुण आहे.दगड मनाने कणखर तसा ठिसूळ असतो.दगड शिखरावर असला काय किंवा तळाशी असला काय त्यास खेद ना खंत असते.
लग्नाची सुपारी दगडावर फोडली जाते.दगड कोरुन मुर्ती बनविली जाते, टिकाऊपणा हा दगडाचा गुणधर्म आहे.लिहिण्याची पाटी दगडाची बनते,त्यावर अक्षर गिरवले जाते.दगडावर डोके ठेवून त्याची उशी बनवली जाते.अनेक शेंगा दगडावर आपटून मोकळ्या केल्या जातात.कुठेकुठे दगडफेक होते.दगडाला शेंदूर फासून त्याचा देव केला जातो.
दगड मऊ असला तरी आपले वजन सोडत नाही.
मळलेले कपडे दगडावर आदळली जातात, लवकर सुकने दगडाचा स्वभाव आहे.समुद्राला थोपविण्याची ताकद फक्त दगडामध्ये आहे.मोठमोठ्या शिळा लिलया जवाबदारी पार पाडतात.
गावातील ओटे दगडांचे असतात, अनेक पिढ्यांना पूरुन उरणारे साक्षीदार असतात.
याशिवाय दगडांचे अनेक उपयोग आहेत.
हे उपयोग बघता मला प्रत्येक दगड देवाचे रुप दिसतो,तो मंदिराचा असो की मस्जिदीचा.चर्चचा असो की गिरजाघरचा.
दगडात देव आहे की नाही, मला माहीत नाही, परंतु दगड हाच देव आहे,असे मी समजतो.