कोण कुणाचं?

             कोण कुणाचं?

या जगात आपले कोण आहे,असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो,त्याचे उत्तर देखील तो स्वतः च देतो.नातेवाईक,गोतावळा, मित्र, परिचित ,प्रशंसक अशा कितीतरी घटकांना आपण आपले मानत असतो आणि एक काल्पनिक सुरक्षाकवच निर्माण करत असतो.आपणास एकटेपणाची किंबहुना या वास्तविकतेची इतकी भीती वाटत असते की
आपणास कायम कुणीतरी सोबत हवे असते, आपल्या अवतीभवती जितक्या लोकांचा गराडा तितके आपण स्वत:ला विसरत चालतो.आपले संपूर्ण आयुष्य इतरांना आपले माणून इतरांच्या विश्वासावर चालते,हा विश्वास कितपत योग्य आहे , याविषयी आपण शंका घेत नाहीत.
आपले मन आपण एकटे असल्याचे समजण्यास
धजावत नाही.संकटकाळी त्यास याची जाणीव
होते परंतु तिथेही कुठल्यातरी स्वार्थापोटी कुणीतरी पुढे सरसावते आणि आपण एकटे नसल्याचा मनुष्य समज करुन घेतो.
आपला जन्म होतो तेव्हा आणि मृत्युसमयी देखील आपण एकटे असतो.दुसऱ्या माणसांसोबत असणे म्हणजे एकटे नसणे असे कधीच समजू नये.वेदना असो वा दु:ख ज्याचे त्यास सोसावे लागते.केवळ आपणास दिलासा देण्यासाठी आपल्या भोवती माणसे जमतात.
आपण हजारों नातेवाईकांच्या, डाक्टरच्या गराड्यात असलो तरी मृत्यू आपणास आल्हाद घेऊन जातो तिथे सोबतचे लोक अडवू शकत नाही.
गरजेसाठी आपण जशा अनेक वस्तूंचा वापर करतो तसाच तो माणसांचा होतो.एकटेपणाची
जाणीव आणि ओळख होणे खुप गरजेचे आहे.
लोकप्रियता वगैरे हे सगळे थोतांड असते.समर्थक हा केवळ भास असतो.नातीगोती हा निव्वळ योगायोग असतो.
या जगात कुणीच कुणाचं नसतं फक्त सहवासाने, संपर्काने तसं वाटायला लागते,तो एक दिलासा असतो.एक खोटे भावनिक जग आपण निर्माण करतो, कुणासाठी तरी आपण जगतो आणि आपले कुणीतरी आहे हा समज फसवा असतो.हा मोहमायेचा पसारा फार त्रोटक लोकांना उमगलेला असतो.
अनेकांवर वर्चस्व प्रस्थापित करुन आपली एकटेपणाची पोकळी भरुन काढली जाते.एकांतात माणसे बेचैन होण्यामागे कारण ते हेच.
आपण एकटे आलो आणि एकटेच जाणार मग
आपण एकटेच होतो हेही लक्षात घ्यावयास हवे.
मार्गावर कुणी भेटले म्हणजे आपण एकटे नाहीत असा दावा चूकीचा आहे.आपल्या सभोवताली आपल्या सारखीच शेकडो माणसे वावरत आहेत,त्यांची आणि आपली गरज एक असल्याने आपण एकमेकांना फसवत आहोत
हेच कुणाच्या लक्षात येत नाही.खोटा का असेना
हा दिलासा त्यास जगण्यासाठी मोलाचा असतो,तरीही तो फसवा आहे हे नाकारता येत नाही.
ज्यांच्याकडे खूप नोकरचाकर असतात ते तर आपण अमर असल्याच्या तोऱ्यात वावरतात, इतरांवर हुकुम गाजवून स्वतः चे एकटेपण विसरण्याचा प्रयत्न करतात.पैसेवाल्यांच्या भोवती जे लोक असतात ते पैशांभोवती असतात.तरीही खोटा दिलासा यातून मिळतो हे नाकारता येत नाही.माणसाचा सर्व खटाटोप एकटेपण घालविण्यासाठी आहे.मनोरंजनाची
सर्व साधने ही केवळ एकटेपणाचा विसर पाडतात.
आपल्या एकटेपणाची जाणीव होणे हे गरजेचे
आहे.यामधून घडायचे ते घडो परंतु वेडेपणात
जगण्यापेक्षा, एकटेपणात जगणे कधीही चांगलेच.लोकांत राहून आपली एकटेपणाची
जाणीव कायम असावी जेणेकरून एकटे नसल्याचा जो भ्रम आहे तो तुटणार नाही.
    ना.रा.खराद
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.