-ना.रा.खराद
पुरुषार्थ आहे.दिवस सरतात तशा आठवणी जाग्या होतात.
मी एक प्रसंग सांगणार आहे. विसरता न येण्यासारखा आणि सांगितलाच पाहिजे असा आहे.नोकरीचे आणि लग्नाचे दूसरे वर्ष होते.पैशाविना विनाअनुदान तत्त्वावर नोकरी मिळाली होती.सहाशे रुपये दरमहा मिळायचे.
कोठूनही मदत मिळत नव्हती.कसाबसा दिवस काढत होतो.कधीतरी चांगले दिवस येतील अशी आशा बाळगून होतो.खुप वाचन करायचो.झपाटल्यासारखे अध्यापन करायचो.शाळेत मान मिळायचा.वेळ निघून जायची.घरी आले की तेच दारिद्र्य, खुप वाईट वाटायचे.गरीबीची दाहकता काय असते,हे खुप अनुभवयाला मिळाले.
एके दिवशी मी शाळेतून घरी आलो,माझ्या घरी मी महाविद्यालयात शिकत असतांना ज्यांच्याकडे भाड्याने रहात होतो ,त्या घराची मालकिन व तीची मुलगी बसलेली होती.काही कामानिमित्त ते अंबडला आले होते.मी इथे रहातो आणि शिक्षक आहे हे त्यांना ठाऊक होते.मला खुप भूक लागलेली होती.ती मालकिन आणि मुलगी खुप भूकेली दिसली.
अद्याप चहा देखील नव्हता.पत्नीकडे बघितले त्या डोळ्यातील अगतिकता आणि अश्रू मी ताडले.घरात अन्नाचा कण नव्हता.काय करावे सुचत नव्हते.नुकताच अंबडला आलो होतो.कुणी ओळखीचेनव्हते.उसनवारीची शक्यता नव्हती.
दोन महिण्यांचे बाळ झोळीत होते.मी त्यांच्याकडे बघितले त्याच्या गळ्यात सोन्याचा ओम दिसला ,तसा माझ्या मनात विचार आला.' हा ओम मोडला तर याचे दिडशे दोनशे रुपये येतील.' मी झोळीकडे झेपावलो.मला बघून ते निरागस बालक चेकाळले.पोटच्या लेकराला बापाचा स्पर्श जाणवला ते अधिक चेकाळले.मी त्यास कडेवर उचलून बाहेर घेऊन गेलो.अलगदपणे तो ओम काढून घेतला .मुलाला पत्नीकडे दिले आणि म्हणालो," आलो दहा मिनिटात."
सोनाराचे दुकान गाठले.दोनशे रुपये मिळाले.
थोडे किराणा सामान घेतले.घर गाठले.सर्वांनी
जेवण केले.घरमालकिनीला निरोप दिला.मागे वळालो.परत झोळीकडे वळालो.मुलाला कडेवर घेतले.प्रेमाणे कवटाळले.आजचा प्रश्र्न तरी त्याच्यामुळे सूटला होता.
बापाच्या पैशांवर मुल जगते हे जगाने बघितले
होते परंतु लहान बाळाच्या पैशांवर बाप जगतो हा नवा प्रकार होता.
माझे ते दैन्य फिटले आहे, परंतु प्रसंग मात्र नाही!