कशाला भाव खाता?
- ना.रा.खराद
हल्ली जो तो ज्या त्या ठिकाणी भाव खाताना दिसतो आहे.कोणत्यातरी कारणाने स्वतःला खूप विशेष समजण्याची स्पर्धा लागली आहे.पैसा,पद,
प्रतिष्ठा, वजन, दहशत, ज्ञान , सौंदर्य वगैरे अशा
शेकडो कारणाने आविर्भाव, अभिनिवेश वाढत चालला आहे.चालण्या बोलण्यातून तो दिसून येत आहे.
इतरांचे लक्ष वेधून घेण्याची , इतरांवर छाप टाकण्याची जशी स्पर्धा लागली आहे.यामुळे सहजता गमावली आहे.एखाद्या नाटकातील पात्राप्रमाणे माणसे वागत आहेत.इतरांच्या तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे.आपण कुणीतरी विशेष आहोत.सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळल्या पाहिजेत हा खटाटोप वाढत चालला आहे.सवगंतेचे त्यासाठी आश्रय घेतला जात आहे.
आपले कर्तृत्व,त्याग,समर्पण हिच आपली खरी ओळख असते.ती इतरांना जाणवत असते.ती सहज असते.त्यासाठी नाक्यावर होर्डिंग्ज लावण्याची गरज नसते.जागोजागी स्वतःची प्रसिद्धी वाढवण्याचा खटाटोप हेच दर्शवितो की मडके अजून कच्चे आहे.
आपणास सामान्य बनून राहता आले पाहिजे ,सहज वागता आले पाहिजे आणि आपले मोठेपण लपवता आले पाहिजे,त्याचे इतरांना ओझे होईल असे वागता कामा नये.तुम्ही कुणीही
असलात आणि काहीही असलात तरी त्याची इतरांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करु नका.
आपण फक्त एक चांगला माणूस आहोत हिच आपली खरी ओळख असली पाहिजे.पदाचा ससेमिरा मागे लागू नये, पैशांचा माज चढू नये,ज्ञानाचा गर्व होऊ नये, प्रसिद्धीचा अहंकार होऊ नये ,शक्तिचा दुरुपयोग होऊ नये ह्याची काळजी घेतली पाहिजे.