- ना.रा.खराद
मुले तासनतास गोट्या खेळतात.मोठ्यांना तो रिकामा उद्योग वाटतो.आपले बालपण आपण विसरलेले असतो.आयुष्य हा एक वेळ आहे,तो घालविण्यासाठी करमणूकीशिवाय दूसरा पर्याय नाही.आपण ज्यास काम म्हणतो ती देखील करमणूक आहे.माकड या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारते,ते कामही आहे आणि करमणूकही.काही माणसे म्हणतात,"कामात वेळ कसा जातो ,कळत नाही." वेळ गेलेला न कळणे म्हणजे करमणूक.
करमणूकीची गरज प्रत्येकाला आणि प्रत्येक वयात असते.बालवयातली खेळणी ही करमणूकीची साधणे होत.पाळण्याभोवती करमणूकीसाठी बरेच उपाय असतात.खुळखुळा वाजवून रडणाऱ्या बाळाला शांत केले जाते,हसवले जाते.झोका दिला जातो.चिऊकाऊच्या गोष्टी सांगितल्या
जातात.मनास रंजन हवे असते.तेच मनोरंजन.मन ज्यामध्ये रमते ते.मन गुंतवावे लागते.नसता मन व्याकुळ होते,भटकते.खिन्न होते.मित्रांसोबत गप्पा मारतांना वेळेचे भान राहत नाही.वेळ न कळणे हाच वेळ घालवण्यासाठी
उत्तम मार्ग आहे.वेळेचा हाच सद्पयोग आहे. वेळ वाया गेला तरी चालेल पण आपण वाया जाता कामा नये.
करमणूकीची लाखों साधने बघता , करमणूकीची गरज किती आहे हे लक्षात येते.सिनेमा, नाटक,मालिका पैसे खर्च करुन,वेळ खर्च करुन बघतात ते कशासाठी?
वयानुसार करमणूकीची साधणे बदलतात.बालवयात करमणूकीसाठी बाहुली
असायची.तरुणपणी बाहुलीने करमणूक होणार नाही.वयानुसार मन बदलते.तासनतास टक लावून बसण्याचे ते वय असते.मन गुंतले की मनोरंजन होते.इतर गोष्टीचा विसर पडू लागला की समजायचे मन रमले आहे.आयुष्यात रमता आले पाहिजे.प्रत्येकाच्या गरजेनुसार करमणूकीची साधने आहेत.ग्रंथालयात दिवस रात्र पुस्तके वाचत बसणारी मंडळी कंटाळा येतो म्हणून नाही तर कंटाळा जातो म्हणूनच बसतात ना.इतरांची करमणूक आपणास रिकामे उद्योग वाटतो.माझी लिहिण्याने करमणूक होते.मलाही कुणीतरी म्हणते,"काही उद्योगधंदे बघा." करमणूक हाच मोठा उद्योग
आहे ,हे कसे सांगू. जीवनातून करमणूक वगळली तर काय उरते.काम देखील करमणूक वाटले पाहिजे , त्यासाठी आवडीचे काम केले पाहिजे.कित्येक कष्टकरी आपल्या कामात आनंदी असतात.त्यांचा वेळ आनंदात जातो.
करमणूकीची अनेक बहाणे आहेत.लग्नसोहळे बघा.लग्न दोघांचे होते.इतर त्या बहाण्याने जे होते ती सर्व करमणूक असते.आपला वेळ जेव्हा आल्हाददायक जातो ,तेव्हा ती करमणूक असते.आकाशात उडणारे विमान आपण घराबाहेर येऊन बघतो कारण करमणूकीचा तो क्षण आपण वाया घालत नाही.तहानभूक हरपून
बालके विविध खेळात रमलेले असतात. ज्यातून करमणूक होते,आनंद मिळतो त्यातून
अजुन काय मिळवायचे असते? बरीच माणसे"यातून तुम्हाला काय मिळते?" असा प्रश्न करतात.समाधान ही दृष्य वस्तू नाही. एखाद्या बागेत मन रमते.विविध रंगाची फुले बघून करमणूक होते.सर्कस बघतांना वेळ कसा मजेत जातो.हसायला मिळाले की कशी करमणूक होते.रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ बघण्यासाठी गर्दी होते.कुस्तीचा खेळ किती आवडीने बघितला जातो.समुद्र किनारी लोक बसतात ते उगीच नाही.कुतुहलाने जगातल्या घडामोडी बघणे ही देखील करमणूक आहे.
अति गंभीर लोक करमणूकीला चूकीचे मानतात.कुणी आनंदी दिसले की ते दु:खी
होतात.या जगाचे त्यांना भले करायचे असते.करमणूकीला ते वेळ वाया घालवणे म्हणतात.
करमणूकीसाठी कुणी संगीत ऐकतो.चित्र रेखाटतो.आवडीचे काही करता आले की करमणूक होते.जगाच्या उद्धारासाठी आपला जन्म नाही.स्वत:पुरते नीट जगता आले तरी जीवन सार्थकी लागते.
वृद्धपकाळात तर करमणूकीची खुप गरज असते.बालवय आणि तरुणपण सरलेले असते.जूनी करमणूकीची साधने या वयात उपयोगाची नसतात.वृद्धाच्या मानसिकतेला अनुसरून साधने शोधावी लागतात.नातवाला मांडीवर खेळवण्याचा आनंद बघण्यासारखा असतो.त्यांचे जूने ऐकन घेतले की त्यांना बरे वाटते. करमणूकीची आपणास गरज असते.एखादा छंद असला की करमणूक उत्तम होते.शेवटी आयुष्य कंठण्यापेक्षा, आयुष्य जगणे महत्वाचे!