सोंग. - ना.रा.खराद
मराठीमध्ये एक म्हण आहे,' झोपेतल्या माणसाला उठवता येते पण झोपेचे सोंग घेऊन पडलेल्याला नाही.असले सोंग प्रत्येकाने कमी जास्त प्रमाणात केलेले असते.
कधी त्याची गरज असते.कुणाला त्याची आवड असते तर कुणाचा तो स्वभावच असतो. सोंगाडी माणसे सर्व ठिकाणी असतात.सोंग म्हंटले की बहाना आलाच.बहाना खोटारडेपणाशिवाय नाही करता येत.बहुरुपी जसे वेगवेगळे सोंग घेतात, तसे हे लोक असतात.सरड्यासारखे नेहमी रंग बदलत असतात.जसे काही कीडे ,प्राणी
मेल्याचे सोंग करतात आणि स्वत:ची सूटका
करुन घेतात.अनेक कैदी कुठले तरी सोंग करुन पोबारा करतात.अनेक ठिकाणी बायका वेगवेगळे सोंग करुन नवऱ्याला वठणीवर आणतात.शाळेतील मुले पोट वगैरे
दुखत असल्याचे सोंग म्हणजे नाटक करतात
जे की खरे नसते.जे खरे नसते तेच सोंग होय.
सोंग जितके विश्र्वसनीय तितके ते यशस्वी होते.अभिनय ,भावनांवर नियंत्रण ठेवता आले
की सोंग उत्तम वठवता येते.सोंग हे ढोंग असते.सोंग खरे वाटू लागले की खरे सोंग वाटू
लागते.सोंग जेव्हा दोन्ही बाजुंनी असते तेव्हा
ते अपयशी ठरते.आपले खरे रुप लपवणे ही
सोंगाची कसोटी असते.भासविणे हे त्याची गरज असते.वठविणे त्याचे कौशल्य असते.तडीस लावणे त्याचे यश असते.आता खरे काही राहिले नाही, फक्त सोंगे उरली आहेत.जीवन सोंगमय झाले आहे.
कामचूकार माणसे,काम चूकविण्यासाठी सोंग करतात.कुणी पैसे वाचविण्यासाठी गरीबीचे सोंग करते.देशसेवेचे,समाजसेवेचे सोंग करुन कुणी पुढारी बनते.प्रेमाचे सोंग करुन लैंगिक शोषण केले जाते.
भक्तिचे, चारित्र्यवान असल्याचे सोंग केले जाते.ज्ञानी,विद्वान असल्याचे सोंग केले जाते.
हुंडा लाटण्यासाठी श्रीमंतीचे सोंग केले जाते.याचकाचे सोंग करुन लूटपाट होते.मैत्रीचे सोंग करुन दगा दिल्याची लाखों उदाहरणे आहेत.रावण देखील भिक्षुकचे सोंग
घेऊनच आला होता.चांगले असणे आणि तसे
सोंग करणे या वेगळ्या बाबी आहेत.फसगत होते ,सोंग न ओळखल्याने .मुखवटे बाजूला सारली की सोंगाड्याचे असली रुप समोर येते.माणसे फसवतात कारण ती फसवू शकतात ,ती का फसवू शकतात कारण त्यांचे
सोंग आपण ओळखू शकलेलो नसतो.
वास्तविक रुपात कुणी कसेही असले तरी त्यापासून आपली फसवणूक होत नाही परंतु
सोंगाड्याच्या सोंगात फसले जाण्याची शक्यता खुप असते.सोंग ओळखता आले की
सोंगाड्याला वठणीवर आणता येते.इतके शहाणपण आपल्या ठिकाणी असावयास हवे.
आपण देखील कोणतेही सोंग करुन नये.