मी एक सामान्य मनुष्य आहे.परंतु माझे सामान्य ज्ञान फार तोकडे आहे आणि ह्याच कारणामुळे मी अधिकारी वगैरे होण्यापासून वाचलो आहे.मला सामान्य नाही तर असामान्य ज्ञानाची ओढआहे.
'पात्रता परीक्षा' या शब्दांचे मला हसू येते.जगभराची माहिती डोक्यात कोंबून आपली पात्रता सिद्ध करावी लागते.जगातला एकही प्रतिभावान व्यक्ति ही पात्रता परीक्षा पास होऊ शकत नाही,कारण त्यांच्याकडे सामान्य ज्ञान नसते म्हणजेच त्यांनी ते मिळवले किंवा जमवले नाही.त्यांना ते जमले नसते असे नाही.लोकांसमोर नाचत नाही याचा अर्थ नाचता येत नाही ,असा होत नसतो.
संशोधक,तत्वज्ञ, तपस्वी,साधक,योगी हे तर या परीक्षेत अयशस्वी होतील,मग ते अपात्र आहेत का? केवळ माहिती संकलित करणे ज्ञान आहे का? समाजसुधारक किंवा सेवक यांचे कृतिशील, निस्वार्थ सेवा हे कमी वाटते का? एका
जागेसाठी लाखों तरुणांना त्यामध्ये ओढणं किंवा त्यांच्यामध्ये स्पर्धा लावणं योग्य आहे का? मुळात या परीक्षेला स्पर्धा परीक्षा म्हणणं कितपत योग्य आहे, कुणाशी स्पर्धा?
सामान्य ज्ञान मिळवून, असामान्य नोकरी मिळवता येते.परंतु असामान्य ज्ञान असून
देखील सामान्य देखील नोकरी मिळवता येत नाही.जेवढे म्हणून ज्ञानी लोक आहेत किंवा
होते ते अधिकारी नव्हते.पात्रतेचे निकष जर माहिती असणे असेल तर ते अपात्र आहेत.
मग जगाला ज्ञान देणारे ज्ञानेश्वर देखील अपात्रच!
माहितीचे कलेक्शन करणे हे काम निव्वळ यांत्रिक आहे.त्यासाठी फक्त घोकंपट्टी हवी.
ज्ञानाची नावड असल्याविना , सामान्य ज्ञानाची आवड निर्माण होत नाही.अधिकारी वगैरे रुक्ष,नीरस असण्यामागचे कदाचित हेच कारण असू शकते.
माहिती जमा करणे ,हिच जर प्रतिभा ठरत असेल तर सर्व प्रतिभावान अपात्र ठरतील.
हल्ली जो तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. शेंकडों पुस्तके वाचत बसतो ते कशासाठी?
नोकरीसाठी.मात्र ज्ञान नोकरीसाठी मिळवले जात नाही.पात्रता शासन ठरवते ती असू शकते.ती खरेच पात्रता असू शकते का?
अधिकारी झाला की मान,पैसा वगैरे खुप मिळतो.हा तर अधिकाराचा,पैशाचा सन्मान
आहे,व्यक्तिचा नाही.आपल्या कार्य कौशल्याने मिळवलेला मान महत्त्वाचा ,नुसता
पदाचा नाही. अधिकाराचे पद मिळाले की माणसे हवेत उडतात.मी यश कसे मिळवले सांगत सुटतात.हे पोटभरू सामान्य ज्ञान ,आता ज्ञान म्हणून खपू लागले आहे.वर्तमानात तेच हिरो
ठरत आहे.हे अधिकाराचे अति उदात्तीकरण साहेबी संस्कृती आणू पहात आहे.
आता घराघरांतून ज्ञानाचे नाही तर सामान्य ज्ञानाचे धडे दिले जात आहे.पोटविद्या हा नवा
ज्ञानाचा प्रकार उदयास आला आहे.